आडगाव पोलिस ठाणे रोल मॉडेल - महाजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. 

नाशिक - नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीतील आडगाव येथील दोन कोटींच्या निधीतून साकारलेले नूतन पोलिस ठाणे म्हणजे राज्यातील पोलिस ठाण्यांसाठीचे आदर्श रोल मॉडेल असल्याचे गौरवोद्‌गार काढत, येत्या महिनाभरात रखडलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले. 

मुंबई-आग्रा महामार्गालगत विडीकामगारनगर रस्त्यावर उभारण्यात आलेल्या आडगाव पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संजय दराडे उपस्थित होते.

पालकमंत्री महाजन म्हणाले, की पोलिसांच्या व्यथा मांडल्या जात नाहीत; परंतु १८ ते २० तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. . लोकप्रतिनिधी, पोलिस यांच्यातील समन्वयातून हे अद्ययावत असे पोलिस ठाणे उभे राहिले असून, अशीच भूमिका कायम राहिल्यास अन्य पोलिस ठाण्यांचे कामकाजही मार्गी लावले जाईल.

परिमंडल -१ चे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार बाळासाहेब सानप यांनी, आडगाव पोलिस ठाण्याप्रमाणेच म्हसरूळ व उपनगर पोलिस ठाणेदेखील स्वमालकीच्या जागेत अशाच अद्ययावत इमारतीत जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी, म्हसरूळ पोलिस ठाण्यासाठी पाच एकर जागा म्हसरूळ परिसरात असून, त्या संदर्भात लवकरच निर्णय लोकप्रतिनिधी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी आभार मानले. या वेळी आर्किटेक्‍ट प्रवीण पगार, कंत्राटदार शैलेश ठोपसे, पोलिस गृहनिर्माण विभागाच्या अधीक्षक अभियंता रूपा गिरासे, अभियंता अरुण नागपुरे यांचा सत्कार पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंचवटी प्रभागातील नगरसेवक, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, अशोक नखाते आदींसह आडगावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.