मोदींकडून कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

मालमत्तेसंदर्भात शहर अभियंता पवार, अधीक्षक अभियंता पगारे यांच्या चौकशीचे आदेश

नाशिक - महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता यू. बी. पवार व भुयारी गटार योजनेचे अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांच्या मालमत्तेविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे तक्रार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल घेतली असून, तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार श्री. पवार व श्री. पगारे यांच्या मालमत्तेची चौकशी करून पंतप्रधान कार्यालयाला अहवाल पाठविला जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.  

महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता यू. बी. पवार व भुयारी गटार योजनेचे अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांनी बेकायदा मालमत्ता संकलित केल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते नरेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता रमेश पवार व वीज विभागाचे निवृत्त उपअभियंता नारायण आगरकर यांच्या कार्यकाळात अनुक्रमे खत प्रकल्पात खरेदी केलेली ६५ कोटींची यंत्रे व बेकायदेशीर एलइडी करारात प्रथमदर्शनी दोषी आढळत असल्याने आयुक्तांनी दोघांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती. 

मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांनी रुग्णालये व हॉटेलला दर वर्षी लागणारा ना हरकत दाखला आवश्‍यक नसल्याचे शासनाने परिपत्रक दडवून ठेवल्याने त्यांचीसुद्धा चौकशी प्रस्तावित आहे. 

दोघांची बेहिशेबी मालमत्ता
अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांचे सिडकोतील सपना थिएटर व त्रिमूर्ती चौकामध्ये प्रत्येकी एक, असे दोन आलिशान बंगले आहेत. त्या बंगल्यांची कोट्यवधींची किंमत आहे. शहर अभियंता यू. बी. पवार यांनी कोट्यवधींची माया जमविली असून, नाशिकमधील उच्चभ्रू वसाहतीत प्लॉट असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सिंहस्थ कालावधीत झालेल्या कामांमधून बेकायदा माया जमविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व प्राप्तिकर विभागातर्फे चौकशी व्हावी, अशी मागणी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाईक यांनी केली होती.