सर्व जिल्हा रुग्णालयांना आठवड्यात सी-पॅप सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जिल्हा रुग्णालयात आता सी-पॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने त्वरित मान्यता दिली आहे. आठवडाभरात राज्यातील सर्व जिल्हा शासकीय रुग्णालयांत सी-पॅप पुरविले जाणार आहेत. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयास किमान चार ते पाच सी-पॅप उपलब्ध होतील.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

नाशिक - राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयांतील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सी-पॅप सुविधा येत्या आठवडाभरात उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या पाच महिन्यांत १८७ नवजात बालके दगावली, तसेच गेल्या महिन्यातही ५५ बालकांचा बळी गेला. सी-पॅपच्या सुविधेमुळे इन्क्‍युबेटरमध्ये दाखल होणाऱ्या नवजात बालकांवर उपचार करणे सोपे होणार आहे. 

इन्क्‍युबेटरचा ‘कोंडवाडा’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालमृत्यूचे वास्तव उजेडात आणले. जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात दाखल होणारे प्रसूतिपूर्व जन्मलेली व अपुऱ्या वजनाची (अत्यंत कमी वजनाचे) बालके दाखल होतात.

नाशिकसारखीच परिस्थिती थोड्याफार फरकाने राज्यातील जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणी असून, इन्क्‍युबेटरची संख्या मर्यादित आहे. मात्र, त्यापेक्षा जास्त प्रमाणात बालके दाखल होतात. त्यातच कमी वजनाची बालके दगावण्याचे प्रमाण अधिक आहे. दाखल होणाऱ्या बालकांना वाचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय वगळता शासकीय रुग्णालयांत व्हेटिंलेटरची सुविधाच नाही. 

‘लेव्हल थ्री’चा प्रस्ताव सादर
नाशिकच्या संदर्भसेवा रुग्णालयात नवजात बालकांसाठीचा अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) व निओनेटॉलॉजी कक्ष सुरू करण्यासंदर्भातील ‘लेव्हल थ्री’चा प्रस्ताव आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. राज्यातील सातही विभागीय आयुक्तांची आज मंत्रालयात बैठक झाली. या वेळी नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी साथीच्या आजारांसंदर्भातील माहिती देत, त्याच वेळी संदर्भसेवा रुग्णालयात नवजात बालकांसाठीच्या निओनेटॉलॉजी  कक्षासाठीचा प्रस्ताव दिला. या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी महापालिकेने प्रस्ताव दिला होता, पण वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने तो नाकारण्यात आला होता.

काय आहे सी-पॅप?
अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरची सुविधा असते. त्याचप्रकारे नवजात बालकांना अतिदक्षता विभागातही तशी सुविधा उपलब्ध करून दिली. पण जिथे नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा नसेल अशा ठिकाणी सी-पॅपची सुविधा देता येऊ शकते. सी-पॅप हे एकप्रकारे लहानसे व्हेंटिलेटरसारखेच कार्य करणारे यंत्र असून, त्याद्वारे व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असलेल्या नवजात बालकांना ऑक्‍सिजन देवून उपचार केले जातात.