अंगणवाडी सकस आहाराला सहा महिन्यांनी लागला मुहूर्त

अंगणवाडी सकस आहाराला सहा महिन्यांनी लागला मुहूर्त

नाशिक - कुठल्याही ठेक्‍याची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर नवीन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे महापालिका आयुक्तांचे स्पष्ट आदेश असतानाही ठेकेदारांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनातील विभागांचा खटाटोप अंगणवाडीतील बालकांच्याही नशिबी आला आहे. सहा महिन्यांनी सकस आहाराच्या ठेक्‍याला स्थायी समितीत मुदतवाढ दिल्याने बालकांच्या सकस आहाराचा तूर्त प्रश्‍न मिटला असला तरी नवीन ठेका का नाही, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरित आहे.

महिला व बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. ४१९ अंगणवाड्यांमधून सुमारे १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्थिकदृष्ट्या मागासलेले विद्यार्थी अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेत असल्याने झोपडपट्टी भागांमध्ये या अंगणवाड्या कार्यरत आहेत.

अंगणावाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून सकस आहार पुरविला जातो. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आहाराचे नियोजन केले जाते. आठवड्यातील सहा दिवस आहार पुरविताना प्रत्येक विद्यार्थ्यामागे सहा रुपये दर ठरवून दिला आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षासाठी ३२ महिला बचत गटांना सकस आहार पुरविण्याचे काम दिले होते. त्या बचत गटांना आहार पुरविण्यासाठी मे २०१७ पर्यंतची मुदत होती. त्यानंतर उन्हाळी सुट्यांमुळे शाळा व अंगणवाडी बंद ठेवल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने नवीन निविदा काढणे आवश्‍यक होते. परंतु निविदा निघाल्या नाहीत. त्यादरम्यान विद्यार्थ्यांना सकस आहाराचा पुरवठा झाला नाही.

सकस आहार मिळत नसल्याची ओरड होऊ लागल्यानंतर महिला व बालकल्याण विकास विभागाने जुन्या बचत गटांना मुदतवाढ देण्याच्या बोलीवर पूर्वीच्याच बचत गटांकडून आहार पुरविण्याचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तो प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर सहा महिन्यांनी आल्यावर त्यास मान्यता देण्यात आली.

असा मिळणार सकस आहार
सोमवार - गूळ, शेंगदाणे, लाडू
मंगळवार - केळी
बुधवार - मटकी, मोडाची उसळ
गुरुवार - गव्हाची लापशी
शुक्रवार - केळी
शनिवार - राजगिरा लाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com