फेरमतमोजणीत वाघ तीन मतांनी विजयी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या फेरमतमोजणीत आज ग्रंथमित्र पॅनलचे भालचंद्र वाघ (बी. जी. वाघ) तीन मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. फेरमतमोजणीत धनंजय बेळे यांना ८९४, तर श्री. वाघ यांना ८९७ मते मिळाली. ‘सावाना’च्या सर्वच्या सर्व १८ जागा ग्रंथमित्र पॅनलला मिळाल्याने त्यांची सत्ता राहणार आहे.

नाशिक - सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या फेरमतमोजणीत आज ग्रंथमित्र पॅनलचे भालचंद्र वाघ (बी. जी. वाघ) तीन मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. फेरमतमोजणीत धनंजय बेळे यांना ८९४, तर श्री. वाघ यांना ८९७ मते मिळाली. ‘सावाना’च्या सर्वच्या सर्व १८ जागा ग्रंथमित्र पॅनलला मिळाल्याने त्यांची सत्ता राहणार आहे.

सार्वजनिक वाचनालयाची २०१७-२२ पंचवार्षिक निवडणूक एप्रिलमध्ये झाली होती. या निवडणुकीत ग्रंथमित्र पॅनलचे १७ आणि जनस्थान पॅनलचा एक उमेदवार निवडून आला होता. ग्रंथमित्रचे बी. जी. वाघ यांचा धनंजय बेळे यांनी एका मताने पराभव केल्यामुळे त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दिला होता; परंतु फेरमतमोजणीला श्री. बेळे यांनी आव्हान दिले होते. त्यांनी धर्मादाय आयुक्तालयात अर्ज दाखल केला. त्या ठिकाणी सुनावणी झाल्यानंतर त्यांनी फेरमतमोजणीला मान्यता दिली. त्यानुसार ३१ ऑक्‍टोबरला फेरमतमोजणी घेण्याचे ठरले. या दिवशी प्रत्यक्ष फेरमतमोजणीला सुरवातही झाली. पण बेळे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. न्यायालयात बेळेंच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचे अर्ज फेटाळले गेल्याने फेरमतमोजणीची प्रक्रिया राबविण्यात आली. आज सकाळी आठला या प्रक्रियेला सुरवात झाली. प्रत्यक्ष मोजणीला पावणेनऊला सुरू झाली. त्यानुसार आठ फेऱ्या झाल्या. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्रक्रिया संपली. या फेरमतमोजणीत श्री. बेळे यांना ८९४, तर श्री. वाघ यांना ८९७ मते मिळाली. तीन मतांनी श्री. वाघ निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. या वेळी ग्रंथमित्र पॅनलचे सदस्य, तसेच समर्थक उपस्थित होते. 

फेरीनिहाय मिळालेली मते
फेरी             धनंजय       बी. जी. 
                    बेळे           वाघ

पहिली    १२१    ११५
दुसरी    १०९    १२४
तिसरी    १२०    ११९
चौथी    १२७    १०८
पाचवी    ११४    १२६
सहावी    १२१    ११६
सातवी    ११८    १२०
आठवी    ६४    ६९
एकूण     ८९४     ८९७

क्षणचित्रे
सकाळी आठला फेरमतमोजणी प्रक्रियेला सुरवात
श्री. बेळेंतर्फे सुरेश गायधनी यांनी फेरमतमोजणी प्रक्रिया अयोग्य असल्याचा अर्ज दिला
श्री. बेळे स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता
श्री. वाघ यांचे हेमंत देवरे, अविनाश वाळुंजे, अमोल बर्वे, अमित पाटील उपस्थित
एकूण १८८४ मतांची मोजणी करण्यात आली 
मतपत्रिकेवर वाघ यांचा ३२ वा क्रमांक, तर बेळे यांचा २० वा
मतमोजणीसाठी चार टेबल, नऊ कर्मचारी 
मतमोजणी कक्षाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी फेरमतमोजणीची प्रक्रिया संपली
दुपारी एकला श्री. वाघ निवडून आल्याचे श्री. भणगे यांनी घोषित केले 
श्री. वाघ यांना विजयी झाल्याची माहिती मिळाल्याने दुपारी एकला मतमोजणीच्या ठिकाणी आले 
श्री. वाघ यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला
कोणत्याही गोंधळाविना फेरमतमोजणी प्रक्रिया शांततेत 

‘सावाना’सारख्या संस्थेत कायद्याची पायमल्ली सभासदांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. निकाल विरोधात जाणार हे अगोदरच माहीत होते. न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना फेरमतमोजणीची प्रक्रिया राबविणे चुकीचे आहे. जनस्थान पॅनलच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहे. 
- धनंजय बेळे, पराभूत उमेदवार, जनस्थान पॅनल

सावानाच्या निवडणुकीत सत्याचाच विजय झाला. दोघांपैकी कोणीही निवडून आले असते, तरी आम्हाला विशेष फरक नव्हता; परंतु श्री. वाघ यांच्या विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. 
- विलास औरंगाबादकर, अध्यक्ष, सावाना

दोन्ही उमेदवारांना याविषयी पत्र दिले होते. बेळे यांनी पत्र स्वीकारले नाही व प्रतिनिधीही पाठवला नाही. बेळेंच्या प्रतिनिधीने ही प्रक्रिया अयोग्य असल्याचे पत्र सकाळी आणून दिले. वाघ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
- माधव भणगे, निवडणूक अधिकारी

यश ग्रंथमित्रच्या सदस्यांचे आहे. छोट्या पदासाठी न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागणे दुर्दैवी आहे. मी माघार घेण्याचाही प्रयत्न केला, पण निवडणूक सुरू असल्याने माघार घेता आली नाही. श्री. बेळे निवडून आले असते, तरी मला आनंद झाला असता. 
- बी. जी. वाघ, विजयी उमेदवार, ग्रंथमित्र पॅनल

Web Title: nashik news bhalchandra wagh three votes won