पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

जुने नाशिक - शेतकरी संपाचा वाहतूक व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे पोल्ट्री व्यवसायाचे रोज 80 लाखांचे नुकसान होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. आवक घटल्यामुळे चिकनच्या दरात सुमारे 50 रुपयांनी वाढ झाली आहे. पोल्ट्री व्यवसाय शेतीशी संबंधित असल्याने कोंबड्यांची व अंड्यांची होणारी वाहतूकही आंदोलनकर्त्यांकडून रोखण्यात येत आहे. कोंबड्या घेऊन निघालेल्या वाहनांची अडवणूक करून कोंबड्यांना रस्त्यावर सोडून देण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी पोल्ट्रीमधून माल भरणे टाळल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचेही नुकसान होत आहे. नाशिकमधून रोज 12 लाख अंड्यांची मागणी असते. त्यातून मोठे व्यापारी व किरकोळ व्यापाऱ्यांचा सुमारे दीड कोटीचा व्यवसाय होतो. शेतकरी संपामुळे त्यावरही परिणाम झाला आहे.