‘स्वीकृत’साठी भाजपला अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक - इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे स्वीकृत नगरसेवकपदांची नावे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला प्रशासनाकडून अल्टिमेटम देण्यात आले. येत्या महासभेत नावे घोषित करावयाची असल्याने महासभा होण्यापूर्वी तीन नावे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने नावे न दिल्यास शिवसेनेने दाखल केलेल्या चारपैकी दोन नावांची घोषणा केली जाणार आहे.

महापौर निवडणूक होऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्यापही स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा होत नाही. भाजपमध्ये तीन जागांसाठी स्पर्धा वाढली आहे. प्रारंभी दीडशेच्या वर इच्छुकांची संख्या पोचली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे ३८ इच्छुकांची यादी पाठविण्यात आली. त्यातून तीन नावांची निवड करताना पश्रश्रेष्ठींची तारांबळ उडाली. नाराजी बाहेर येण्याच्या धास्तीने वरिष्ठांकडून नावे जाहीर होत नाही. त्यात आमदार, पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची नावे पुढे येत असल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढली आहे. सध्या प्रशांत जाधव, बाजीराव भागवत व नीलेश बोरा यांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेनेने दोन जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी नावे देऊन भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मागील महासभेत शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्याची मागणी फेटाळल्याने दबाव वाढला आहे. प्रशासनाकडून भाजपला अल्टिमेटम दिला असून, नोव्हेंबरमधील महासभेपूर्वी स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.

शिवसेनेकडून गोडसे, दीक्षित
शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी चार इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख सुनील गोडसे व राजू वाकसरे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख ॲड. श्‍यामला दीक्षित व पदाधिकारी मंगला गायकवाड यांचे अर्ज आहेत. गोडसे व ॲड. दीक्षित यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळणार असल्याचे समजते.