विषय समित्यांसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कुलकर्णी, हिरे, माळोदे, दोंदे, भामरे यांना संधी

नाशिक - महापालिकेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांच्या सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक पुढच्या आठवड्यात होणार आहे. त्यासाठी भाजपने सभापती व उपसभापतिपदांसाठी नावांची घोषणा केली. 

ज्येष्ठ नेते सतीश कुलकर्णी आरोग्य समिती सभापतिपदाचे, तर उपसभापतिपदासाठी शांता हिरे यांचे नाव आमदार बाळासाहेब सानप यांनी घोषित केले. विधी समितीच्या सभापतिपदी शीतल माळोदे, तर उपसभापतिपदी राकेश दोंदे, शहर सुधार समितीच्या सभापतिपदी भगवान दोंदे, तर उपसभापतिपदी स्वाती भामरे यांचे नाव घोषित करण्यात आले. भाजपकडून उमेदवार जाहीर करताना पूर्व, मध्य व पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आल्याचा दावा आमदार सानप यांनी केला. महापालिकेत तिन्ही समित्या नव्याने स्थापन झाल्या आहेत. प्रत्येक समितीचे नऊ सभासद आहेत. त्यातून सभापती व उपसभापतींची निवड केली जाईल. 

प्रत्येक समितीत भाजपचे पाच सदस्य असल्याने आज जाहीर झालेल्या सभापती व उपसभापतींची निवड निश्‍चित आहे. शिवसेनेने उमेदवार उभे केल्यास निवडणूक अटळ राहील, अन्यथा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने नावे न दिल्याने त्याऐवजी मनसेच्या नगरसेवकांना विषय समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी साडेदहा ते दीडदरम्यान तीनही समित्यांची निवडणूक होईल.