काळोख्या जगात "ब्रेल' पुस्तकांचा प्रकाश

हर्षदा देशपांडे
मंगळवार, 13 जून 2017

वीणा सहस्रबुद्धे यांची बांधिलकी; पाचशे पुस्तकांचे रूपांतर

वीणा सहस्रबुद्धे यांची बांधिलकी; पाचशे पुस्तकांचे रूपांतर
नाशिक - दृष्टिहीन मला, सुरम्य मोहक जशी, हा जन्म का तू दिला, नाही या नशिबी सुरूप बघणे, दूरवर वाटे मला, भावाचा करी कुंचला धरूनी मी चित्रकृती रेखिली, स्पर्शाने जणू पाहुनी, सुखवूनी संतोषलो मी मनी...अशी व्यथा आपल्या बोलण्यातून मांडणारे अंधबांधव. मनातल्या मनातच प्रत्येक कृतीची केवळ दिखाऊ अनुभूती घेतात, स्वप्नातच जगण्याचा प्रयत्न करतात. ब्रेललिपीमुळे काहीशा प्रमाणात हा अडसर दूर होऊ लागला असला तरी शिक्षणाअभावी अनेक अंधबांधव लिहिणे, वाचण्यासारख्या प्रक्रियेपासून दूर आहेत. अशाच बांधवांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न नाशिकच्या वीणा सहस्रबुद्धे करत आहेत.

दासबोधापासून तर अग्निपंखापर्यंत अशा पाचशेहून अधिक पुस्तकांच्या ब्रेललिपीतील भाषांतराद्वारे त्यांनी माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी प्रसंगी पदरमोडही केली....पण ध्यास एकच अंधांसाठी काहीतरी वेगळे करण्याचे!

अंधबांधवांची पूर्वी हेळसांड होत होती, मात्र आता चित्र बदलत चालले आहे. समाजही सकारात्मक भावनेतून त्यांच्याकडे बघत असून सामाजिक कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे. नाशिकच्या सहस्रबुद्धे यापैकीच एक. वीणा सहस्रबुद्धे यांनी 1998 मध्ये अंधांसाठी काम करण्यास सुरवात केली. एका अंध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करताना त्यांना जाणवले की यांच्यासाठी जगणे खूपच अवघड आहे. शिक्षणाचा मार्ग यांना बऱ्याचअंशी जगणं सुकर करू शकतो. त्यामुळे पुढे त्यांनी थर्ड आय असोसिएशनची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून त्या अंधांसाठी काम करतात.

ऑडिओ शिक्षणाद्वारे श्रीगणेशा
सहस्रबुद्धे यांनी सुरवातीला ऑडिओवर भर देण्यात आला. छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी श्रवणीय अशी गाणी, गोष्टी तयार केल्या. मात्र, कॅसेट तयार करण्यावरही मर्यादा होत्या आणि त्याचा तो इम्पॅक्‍ट साधला जात नव्हता. त्यामुळे पुढे जाऊन त्याच माध्यमातून त्यांनी शिक्षणाची अनेक पुस्तकं ब्रेल लिपीत रूपांतरित केली. दहावी, बारावी, बी.ए., एम.ए.पासून ते बॅंकिंग, एमपीएससी, यूपीएससीची अनेक पुस्तकं ब्रेल लिपीत रूपांतरित केली आहेत. त्यानंतर त्यांना जाणवले की, फक्त शिक्षणच नाही तर वाचन संस्कृतीतील अनेक पुस्तकं ही दृष्टिहीनांना बौद्धिक समृद्ध करू शकतील. त्यातून लोकांच्या मागणीतून अनेक पुस्तकांना ब्रेलमध्ये रूपांतरित करण्यात आले.

पुस्तकासाठी पदरमोड नित्याचीच
ब्रेल लिपीची पुस्तके तयार करताना मूळ कॉपी डीटीपी करून सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून पुढे ती ब्रेल लिपीत रूपांतरित करण्यात येतात. ही प्रक्रिया बऱ्यापैकी खर्चिक आहे. एक पान ब्रेल लिपीत करण्यासाठी जवळपास 60 रुपये पडतात. आतापर्यंत अनेकांच्या सहकार्यातून पाचशेच्या आसपास पुस्तकं ही ब्रेल लिपीत रूपांतरित करण्यात आली आहेत. 2014 मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर दोन्ही मुलं परदेशांत स्थायिक झाली. त्यानंतर त्यांनी आयुष्यातील आपला वेळ सार्थकी लागावा, या हेतूने त्यांनी पूर्णपणे या कामात स्वतःला गुंतवून घेतले. अंधांसाठी दररोजचा संपर्क येऊ लागल्याने त्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कथा, कादंबऱ्या उपलब्ध झाल्या तर किती छान होईल.

चेहऱ्यावर आनंद अन्‌ समाधान
वाचाल तर वाचाल! हा सुविचार शाळेत अनेकदा वाचण्यास मिळतो, दृष्टिहीन मात्र या वाचनसमृद्धीपासून अनेकदा वंचित राहतात. ब्रेल लिपीच्या साहाय्याने त्यांचा वाचनप्रवास फारच मर्यादित होता, त्याला अथांग रूप देण्याचे काम नाशिकच्या वीणा सहस्रबुद्धे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांतून आज अनेक अंधबांधव ब्रेल लिपीद्वारे वाचनाचा आनंद घेऊ लागले आहेत.