तिबेटियन जनतेच्या स्वातंत्र्यासाठी भारताकडून अपेक्षा - ब्रिजमोहन चौधरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

नाशिक - तिबेटमधील डोंगराळ भागातील चीन सैन्याची जमवाजमव आणि कैलास मानसरोवर यात्रा नाथुलापासमार्गे चीनने बंद केली आहे. या पार्श्‍वभूमीवर चौधरी यात्रा कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी ८० भाविकांची कैलास मानसरोवर यात्रा नेपाळगंज-हिलसामार्गे पूर्ण केली. या प्रवासात श्री. चौधरी यांनी तकलाकोट आणि दारचेनमध्ये तिबेटियनमधील रहिवाशांशी केलेल्या चर्चांत तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या भारताकडून अपेक्षा असल्याचे स्पष्ट झाल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.

हिलसापासून तीस किलोमीटरवर तकलाकोट आणि पुढे शंभर किलोमीटरवर दारचेन आहे. या ठिकाणचे तिबेटियन शंभर टक्के चीनच्या विरोधात असल्याची ठसठस संवादातून पुढे आली, असे सांगून श्री. चौधरी म्हणाले, की चीनची दडपशाही सुरू असल्याची खंत तिबेटियन व्यक्त करीत होते. गेल्या पंधरा वर्षांपासून भारतातच नव्हे, तर कुठल्याही देशात जाण्याची परवानगी दिली जात नाही. आपल्या तुलनेत ऑक्‍सिजनचे प्रमाण पन्नास टक्के असल्याने चिनी तिथे यायला तयार नाहीत. पण चिनी लोकांनी तेथे जावे यासाठी निरनिराळ्या क्‍लृप्त्या केल्या जातात. अलीकडे चिनी भाषा येणाऱ्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याने दडपशाहीला कंटाळलेल्या तिबेटियन बांधवांनी पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांना चिनी भाषा शिकवावी लागेल, अशी द्विधा मनःस्थिती मांडली.

इतर मार्ग बंदची भीती
नाथुलापासमार्गे जाणाऱ्या यात्रेकरूंना चीन सरकारने परत पाठविले. त्यामुळे लिपुलेकदरा आणि नेपाळगंज-हिलसा हे दोन मार्ग बंद होतील काय, अशी भीती यात्रेकरूंमध्ये होती. पण ९ जुलैला सुरू झालेली ८० भाविकांची कैलास मानसरोवर यात्रा १९ जुलैला यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. हिलसापासून पुढे असलेल्या चीन सैनिकांकडून यात्रेकरूंची कसून तपासणी केली गेली. दुभाषी म्हणून काम करणाऱ्या तिबेटियन बांधवांच्या मदतीने तपासणी करता आली आहे, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले.

दलाई लामांचे चित्र दिसले की...
भारतातून तिबेटमध्ये परतत असताना दलाई लामांचे चित्र दिसले, की ते चीन सैनिकांकडून परत भारतात पाठविले जाते. मोबाईल, पुस्तक अथवा कशातही दलाई लामांचे चित्र आढळू नये इतकी कसून तपासणी केली जाते. मेमध्ये होमहवनाचे साहित्य घेऊन एका कागदामध्ये गुंडाळून काही जण चालले होते. तपासणीत कागदावर दलाई लामांचे चित्र पाहिल्यावर त्याला परत पाठविले. ही सारी व्यथा तिबेटच्या रहिवाशांकडून ऐकावयास मिळाली आहे, असे सांगून श्री. चौधरी यांनी अष्टपाद आणि धरमपुरी या ठिकाणी यात्रेकरूंना चीन सैनिकांकडून परवानगी नसल्याची माहिती दिली.