सोनसाखळी चोरट्यांविरोधात  ‘मोक्का’ला हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नाशिक - नाशिकसह लगतच्या जिल्ह्यात दुचाक्‍यांची तसेच सोनसाखळ्या ओरबाडून नेणाऱ्या तीन अट्टल सोनसाखळी चोरट्यांविरोधात आज जिल्हा न्यायालयात ‘मोक्का’न्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिस आयुक्तालयामार्फत संशयितांविरोधात ‘मोक्‍का’च्या प्रस्तावाला अप्पर पोलिस महासंचालकांनी मंजुरी दिली. 

अट्टल सोनसाखळी चोरटे संशयित किशोर अशोक धोत्रे (वय २९, रा. शांतीनगर, अंबड औद्योगिक वसाहत), बाळू चंदर जाधव (३२, रा. शांतीनगर, अंबड औद्योगिक वसाहत), विनोद गंगाराम पवार (२९, रा. भगतसिंगनगर झोपडपट्टी, इंदिरानगर) यांना गुन्हे शाखेने डिसेंबर २०१६ मध्ये अटक केली होती. तीन संशयितांनी संघटितरीत्या नाशिक आयुक्तालय हद्दीतील अंबड, आडगाव, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबई नाका व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी बळजबरीने ओढून जबरी चोरीच्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली होती. नाशिकसह राहुल (जि. नगर) येथे दुचाकी चोरीचीही कबुली दिली होती. अंबड पोलिसांत १४ गुन्हे दाखल असून, त्यासंदर्भातील पुरावेही पोलिसांनी सादर करून चार लाख ९५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यानुसार तिघांविरोधात संघटितरीत्या गुन्हेगारी केल्याप्रकरणी मोक्कान्वये कारवाई केली होती आणि तसा प्रस्ताव अप्पर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) सादर करण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने आज ‘मोक्का’न्वये दोषारोपपत्र विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाकडे सादर करण्यात आले. सहाय्यक आयुक्त सचिन गोरे यांनी या प्रकरणाचा तपास केला आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गिरमे, हवालदार चंद्रकांत सदावर्ते, शरद सोनवणे, नीलेश भोईर यांनी कामगिरी बजावली.