चांदवडजवळ जप्त शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटलेला

चांदवडजवळ जप्त शस्त्रसाठा उत्तर प्रदेशातून लुटलेला

नाशिक/चांदवड - मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोलनाक्‍यावर गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा बोलेरो पिक-अपमध्ये सापडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील संशयित मुंबईतील गुन्हेगारी जगताशी संबंधित असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. संशयितांनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात न्यू पंजाब मेसर्स हे हत्यार विक्रीचे दुकान फोडून ही शस्त्रे लुटली आणि ती मुंबईत नेत असताना चांदवड पोलिसांनी हस्तगत केली. ज्या दुकानावर दरोडा टाकला तेथील सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद झाले आहेत.

पोलिसांनी बद्रीनुजमान अकबर बादशाह (वय २७, रा. शिवडी, मुंबई), सलमान अमानुल्ला खान (वय २१, रा. शिवडी, मच्छी गोडाऊन, मुंबई) व नागेश राजेंद्र बनसोडे (वय २३, रा. वडाळा, नाशिक) या तिघांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम ३, ७, २५ नुसार बेकायदा शस्त्रसाठा बाळगणे, तसेच भादंवि ३५३, ४६८, ४८३, ३४ गुन्हेगारी बळ प्रयोग, बनावटीकरण, संगनमताने गुन्हा करणे हे आरोप ठेवले आहेत. या तिघांना आज चांदवड न्यायालयात उपस्थित केले असता प्रधान न्यायाधीश के. जी. चौधरी यांनी त्यांना २८ डिसेंबरपर्यंत १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

अशी आणली शस्त्रे...
हे तिघेही दोन दिवसांपूर्वी संबंधित हत्यारे विक्रीच्या दुकानात गेले होते. दिवसभर दुकानाची रेकी केल्यानंतर त्यांनी रात्री हे दुकान फोडले आणि हत्यारांची चोरी करून ते बोलेरोतून मुंबईच्या दिशेने निघाले. बांदा पोलिस ठाण्यात या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, संशयितांनी ही हत्यारे बोलेरोमध्ये लपवून चांदवडपर्यंतचे अंतर बिनधिक्कत पारही केले. दरम्यान, न्यू पंजाब मेसर्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित टिपले गेले आहेत. 

ग्रामीण पोलिसांनी हत्यारे हस्तगत केल्यानंतर त्यावरील स्टिकर्सवरून बांदा पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरून दरोड्याची खात्री झाली. ग्रामीण पोलिस अजूनही बांदा पोलिसांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, या दरोड्यात २५० हत्यारांची चोरी झाल्याचे बोलले जात असताना, प्रत्यक्षात २३ रायफल्स व १९ गावठी कट्टेच, दोन मोबाईल फोन, एक घड्याळ, एक गॅसकटर, एक लोखंडी कटावणी, लहान मोठे पहाणे असलेला सेट, मोठी हतोडी, रोख १८ हजार २०० रुपये व दोन लाख किमतीची बोलेरो गाडीसह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे संशयितांनी अन्य हत्यारे रात्रीतून कोणाला विकली, नेमक्‍या किती हत्यारांची चोरी झाली, याचा तपास पोलिस करीत आहेत. तसेच संशयितांचे संबंध दहशतवाद्यांची आहेत की गुन्हेगारी जगताशी की नक्षलवाद्यांशी याचाही पोलिस शोध घेत आहेत. 

बादशाहचे अंडरवर्ल्डशी संबंध
चांदवड टोलनाक्‍यावर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आलेला संशयित बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका (वय २७, रा. शिवडी, मुंबई) हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत बेकायदा हत्यार बाळगल्याचे सुमारे ६० गुन्हे दाखल असल्याचे समजते. तसेच, बादशाहाचे मुंबईतील गुन्हेगारी जगताशी थेट संबंध असून, गुन्हेगारांना हत्यारे पुरविण्याचे कामच तो करतो अशीही माहिती समोर आली आहे. संशयितांची मुंबईतील माहिती घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांची दोन पथके मुंबईला रवाना झाली आहेत. 

हवालदाराला पैशांची ऑफर
चांदवड पोलिस ठाण्यात संशयितांसह बोलेरो वाहन आणल्यानंतर मुख्य संशयित बादशाह याने कारवाई करणाऱ्या चांदवड पोलिसांतील एका हवालदाराला सुटका करून घेण्यासाठी भल्या मोठ्या रकमेचीही ऑफर दिली होती; परंतु त्या प्रामाणिक हवालदाराने बादशाहाची ऑफर ठोकरली. 

असा झाला शस्त्रसाठ्याचा प्रवास
संबंधित शस्त्रसाठा मुंबईत पोचविण्यासाठी बादशाहाने सर्वप्रथम बोलेरो गाडी ऑनलाइन ओएलएक्‍सवरून खरेदी केली. त्यानंतर गॅसकटरच्या सहाय्याने शस्त्रसाठा ठेवण्यासाठी गाडीच्या छताला विशिष्ट प्रकारचे कप्पे बनविण्यात आले. तसेच गाडी ज्या जिल्ह्यांतून जाणार आहे, तेथील पासिंगच्या बनावट नंबर प्लेट, निवासासाठी बनावट ओळखपत्रे बनविली. प्रवासादरम्यान कुणाला संशय येऊ नये म्हणून ड्रायव्हरशेजारी बारा-तेरा वर्षांचा मुलगा बसविलेला असे आणि बादशाह स्वत: मात्र मधल्या सीटवर कोरेक्‍स नावाच्या नशेची बाटली आणि गांजाचा हुक्का ओढत बसलेला असे.

सत्तावीसशे रुपयांसाठी अडकला 
मुंगसे (ता. मालेगाव) येथील पेट्रोलपंपावर बादशाहाने दोन हजार ७०० रुपयांचे डिझेल गाडीत भरून घेतले व पैसे न देता तो गाडी घेऊन पसार झाला. त्यावरून सापळा रचून त्याला चांदवड टोलनाक्‍यावर ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्या वेळी त्याने डिझेलच्या दोन हजार ७०० रुपयांऐवजी दहा हजार रुपये देतो, विषय येथेच मिटवा, अशी ऑफर पोलिस व पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांना दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला व त्यांनी गाडी पोलिस ठाण्यात आणली. तेथे आणखी तपास केला असता पोलिसांना शस्त्रसाठ्याचे घबाड सापडले. 

असा आहे शस्त्रसाठा 
रिव्हॉल्व्हर    १७ 
परदेशी बनावटीचे पिस्तूल    २
पंप ॲक्‍शन गन    १ 
रायफल    १ 
१२ बोअर डबल बॅरलच्या रायफल    ८
१२ बोअर सिंगल बॅरलच्या रायफल    २
पॉइंट २२ रायफल    १०
जिवंत काडतुसे    ४१४२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com