पतंगांमुळे चिमुकल्यांचा जीव धोक्‍यात

पतंगांमुळे चिमुकल्यांचा जीव धोक्‍यात

नाशिक - पंचवटीतील फुलेनगरमध्ये लोंबकळत्या वीजतारांना लटकलेला पतंग काढताना दहावर्षीय चिमुकल्यास जीव गमवावा लागल्याची घटना घडल्याने लोंबकळत्या वीजतारा आणि नायलॉन मांजाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला. महापालिकेकडून वीजतारा भूमिगत करण्याबाबत दिरंगाई होत आहे, तर नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची मोहीम अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे पतंगांची हौस चिमुकल्यांच्या जिवावर बेतण्याचे प्रसंग घडू लागले आहेत.  

फुलेनगरमध्ये दहावर्षीय चिमुकल्याला पतंगांच्या हौसेमुळे जीव गमवावा लागला. शहरातील झोपडपट्ट्यांसह जुने नाशिक, सिडको या दाट लोकवस्तीच्या परिसरात अद्याप धोकादायकरीत्या लोंबकळत्या वीजतारा आहेत. पतंग उडवताना या तारांमध्ये तो हमखास अडकतो आणि तो अडकलेला पतंग काढताना अनेकदा विजेचा धक्का बसून दुर्घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षीही नाशिक रोड, सिडकोत दोन घटनांत दोन मुलांना जीव गमवावा लागला होता.

राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वीच नायलॉन मांजावर बंदी घातली असतानाही नायलॉन मांजाची विक्री पोलिसांना रोखता आलेली नाही. पोलिसांकडून छापे टाकून कारवाई केली जाते. तरीही नायलॉन मांजा विक्री थांबलेली नाही. उलट चोरीच्या मार्गाने त्याची विक्री होते. त्यामुळे पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागतो, तर अनेक दुचाकी-सायकलस्वारांना दुखापती झाल्या आहेत. पतंगांचे माहेरघर असलेल्या येवल्यात नायलॉन मांजामुळे एकाचा गळा चिरून तब्बल ३५ टाके घालावे लागल्याचा गंभीर प्रकार घडला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन, पोलिसांकडून जनजागृतीपर उपक्रमांसह कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याची अपेक्षा आहे.

शाळांमध्ये जागृती 
गेल्या वर्षी पोलिस-पक्षीप्रेमींनी एकत्रित शाळा-महाविद्यालयांत नायलॉन मांजाविरोधात जनजागृतीपर प्रबोधनात्मक उपक्रम राबविले. मुलांमध्येच पतंग उडविण्याची इच्छा अधिक असल्याने याच वर्गाला लक्ष्य करून उपक्रम राबविले गेले. त्याचा चांगला परिणामही दिसून आला होता; परंतु १०० टक्के यश आले नव्हते. यंदा पुन्हा प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेऊन नायलॉन मांजाचा नायनाट करण्यासाठीचे आव्हान उभे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com