सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळांमध्ये क्‍लब

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून शाळांमध्ये क्‍लब

राज्यातील पहिला उपक्रम - ४५ हजार विद्यार्थी बनले सायबर साक्षर, लाखाचे उद्दिष्ट, जनजागृतीवर भर

नाशिक - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्ट्राग्राम यांसह सोशल मीडियाची सहजरीत्या आजची पिढी हाताळणी करीत आहे. पण बऱ्याचदा सोशल मीडियाचे अज्ञान वा त्याचा गैरवापर होण्याची शक्‍यता अधिक असते. अशा वेळी अनेकांची बदनामी, फसवणूक होऊन मनस्ताप होतो. त्यासाठी नाशिक सायबर पोलिसांनी शाळकरी मुलांपासून ते कॉर्पोरेट स्तरावर ‘सायबर क्‍लब’ या संकल्पनेची निर्मिती केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत शहरातील ४५ हजार शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी ‘सायबर साक्षर’ झाले आहेत.

आणखी लाखभर विद्यार्थ्यांपर्यंत क्‍लब पोचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अशी संकल्पना राज्यात पहिल्यांदाच नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत राबविली आहे. 

आजचे युग माहिती तंत्रज्ञानाचे असून, इंटरनेटचा वापर खेड्यापाड्यांपर्यंत जाऊन पोचला आहे. तसाच सोशल मीडियावर सर्वाधिक ‘ॲक्‍टिव्ह’ असलेला तरुणवर्गही जोडला आहे. हे खरं असलं, तरी इंटरनेटच्या माध्यमातूनही काही अपप्रवृत्तींचा शिरकावही सोशल मीडियात झाला आहे. याच अपप्रवृत्ती पोलिसांसाठी येत्या काळात मोठे आव्हान असतील. नाशिक सायबर पोलिसांनी आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्‍लबची संकल्पना अस्तित्वात आणली. ही १५ डिसेंबर २०१६ ला प्रत्यक्षात आली. आयुक्तालयाच्या सायबर शाखेत पहिल्यांदा ‘सायबर क्‍लब’ची स्थापना झाली.

सायबर क्‍लब संकल्पना वेगळीच
सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर संकल्पना अस्तित्वात आली. या क्‍लबद्वारे शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच रहिवासी भागातील नागरिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजक यांना ‘इंटरनेटचा वापर आणि सावधानता’ याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. सायबर क्‍लबच्या माध्यमातून पोलिसांनी पहिल्या टप्प्यात ५० शाळा-महाविद्यालयांतील ३५ हजार विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या टप्प्यात २१ शाळांमधील दहा हजार २७२ विद्यार्थ्यांना ‘सायबर’चे प्रशिक्षण दिले. यातूनच सायबर बॉइज, गर्ल्स ॲम्बॅसिडर निवडण्यात आले. त्यांच्यातर्फे अन्य विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर, गैरवापर याविषयी मार्गदर्शन केले.

सायबर क्‍लबमुळेच संशयित अटक 
सायबर क्‍लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत जनजागृती केली गेली. परिणामी उपनगर येथील एका तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्यात आली होती. तरुणीने सायबर पोलिसांत तक्रार करताचा संशयित तरुणाला अटक केली होती. तरुणांमधील जनजागृतीमुळेच हा प्रकार समोर आला होता.

सायबर क्‍लबच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा वापर व धोके लक्षात येतात. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांनी सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांत जनजागृती करता येणे शक्‍य होईल. 
- अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

या तीन टप्प्यांत मार्गदर्शन
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची अधिक ओळख देणे, वापर व गैरवापराविषयी जाणीव करून देणे.

माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची बऱ्यापैकी ओळख असल्याने त्यांना त्यातील सुरक्षितता व वापरावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन, तसेच धोके कसे टाळता येईल यावर भर दिला जातो.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटरनेटची माहिती अधिक असल्याने त्यांना वापराऐवजी सुरक्षितता धोक्‍याची माहिती देण्यास प्राधान्य. 

रहिवासी नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीसंदर्भातील माहिती देतानाच ‘ओटीपी’च्या गोपनीयतेची जाणीव करून देणे. 

कॉर्पोरेट स्तरातील नागरिकांना परदेशातून येणाऱ्या फसव्या स्किम वा अन्य फसवणुकीपासून सावधगिरी बाळगण्याविषयीचीही माहिती दिली जाते. 

सायबर विशेष पथकासह परिसरातील पोलिस ठाण्यांचे अधिकारी शाळा-महाविद्यालयांत जाऊन मार्गदर्शन करतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com