शेतकरी उद्रेक हा कॉंग्रेसी अपयशाचा परिपाक - अर्थमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नाशिक - शेतकरी रस्त्यावर आले म्हणजे ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही. ते त्यांच्या मागण्यांच्या शुद्ध हेतूने आंदोलन करीत आहेत; पण शेतकऱ्यांचा उद्रेक वाढण्याला कॉंग्रेस आघाडीच्या 15 वर्षांचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीपेक्षाही कॉंग्रेसच्या कारकिर्दीतील चुकीच्या कामांतून पापमुक्ती हवी असलेली कॉंग्रेसी मंडळी या विषयाचे राजकारण करीत आहेत; पण सरकार मात्र शेतकरी संपाबाबत गंभीर आहे. अडीच वर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटणारे नाहीत. त्यामुळेच गाळमुक्ती, जलयुक्त शिवार, पीकविम्यात बदल यांसारख्या अनेक उपक्रमांतून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यावर सरकारचा भर आहे, असे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वनविभागाच्या आढावा बैठकीला आलेले मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शेतकरी आंदोलन शुद्ध मागण्यांचे आहे. सरकार त्याबाबत गंभीर असून आतापर्यत 4 बैठका झाल्या आहेत. अडीच वर्षांपासून त्यावर सरकार उपाय करते आहे. वीज, पाणी हे शेतीसाठीचे मूलभूत घटक असल्याने दोन वर्षांत त्यावर काम करत आहे.

अर्थमंत्री म्हणाले
राज्य सरकार शेतकरी संपाबाबत गंभीरच
कर्जमुक्तीसाठी सरकार अडीच वर्षांपासून कार्यरत
शेतकरी कर्जात सापडू नये, या भूमिकेतून उपाय
शेतकरी योजनांसह प्राधान्यक्षेत्रात भरघोस वाढ