लग्नाचा तगादा बेतला हर्षदाच्या जिवावर

लग्नाचा तगादा बेतला हर्षदाच्या जिवावर

नाशिक/ नाशिक रोड - एकलहरे रोडवर अर्धवट जळालेल्या २१ वर्षीय युवतीच्या खुनाची उकल झाली असून, पोलिसांनी शिताफीने तिचा प्रियकर रोहित पाटील व त्याची बहीण मोहिनीला अटक केली आहे. सतत लग्नाचा तगादा आणि लग्न न केल्यास आत्महत्या करण्याची दिलेली धमकी मृत हर्षदा अहिरे हिच्या जिवावर बेतली. 

दरम्यान, दोन्ही संशयितांना न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हर्षदा भास्कर अहिरे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी, आकाश पेट्रोलपंपामागे, कलानगर, दिंडोरी रोड) हिचा ८० टक्‍के जळालेला मृतदेह एकलहरे रोडवरील निर्जनस्थळी काल (ता. ३०) सकाळी आढळून आला होता. या संदर्भात नाशिक रोड पोलिसांनी शहर परिसरातील बेपत्ता युवतींच्या तक्रारींची माहिती घेतली असता, गंगापूर पोलिसांत दाखल असलेल्या तक्रारदारांना जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलाविले. हर्षदाच्या अंगावरील कपडे, घड्याळ व अंगठीवरून तिची ओळख पटली. 

हर्षदा के. के. वाघ महाविद्यालयाती बीएस्सीच्या वर्गात शिकत होती. ती कॉलेज रोडवरील खासगी क्‍लासेसमध्ये पार्टटाइम काम करीत होती. अकरावीपासून तिच्यासोबत शिकलेला व सध्या संदीप फाउंडेशनमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत असलेल्या रोहित रवींद्र पाटील (वय २१, रा. मयुरेश्‍वर डुप्लेक्‍स, अशोकनगर, सातपूर) याच्याशी तिचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २९ मेस दुपारी हर्षदा क्‍लासला आली असता, त्याने बाहेर जाण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. पुन्हा त्यांच्यात लग्नावरून वाद झाला. हर्षदाने, लग्न नाही केले तर आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे रोहितने चाकूने हर्षदाच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्याने तिचा मृतदेह मोठ्या सूटकेसमध्ये ठेवला आणि रात्र होण्याची वाट पाहिली. तोपर्यंत त्याने तिच्याकडील मोबाईल व चाकू घरालगतच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला. रोहितने रात्री दीडच्या सुमारास हर्षदाचा मृतदेह ठेवलेली सूटकेस मोपेडवर (एमएच १५, ईटी ०९०२) ठेवून त्याने एकलहरे रोडकडे जाऊन निर्जनस्थळी तिचा मृतदेह काढला आणि त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिला.

अशी झाली उकल
हर्षदा घरी न आल्याने रोहित तिचा मामा व आईचे सांत्वन करीत होता. हर्षदाच्या मोबाईलवरील संभाषणाची तांत्रिक तपासणी केली असता, शेवटचा कॉल संशयित रोहित पाटील याच्याशी झाला होता. आज पोलिसांनी मोबाईल संभाषणावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसीखाक्‍या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. खुनात त्याची बहीण मोहिनी पाटील (वय २३) हिने पुरावा नष्ट करण्यास मदत केली होती. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, पोलिसांनी सूटकेस, ड्रेनेजमध्ये फेकलेला मोबाईल व चाकू जप्त केला आहे. अवघ्या १२ तासांत नाशिक रोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व त्यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com