दोन सोनसाखळीचोर जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

जुने नाशिक -  उपनगर हद्दीतून महिलेची सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या दोन संशयितांना गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतून अटक करण्यात आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुने नाशिक -  उपनगर हद्दीतून महिलेची सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या दोन संशयितांना गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतून अटक करण्यात आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतून आज सकाळी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी खेचून पळ काढला होता. याबाबत नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेशावरून सर्व पोलिस ठाण्यांना माहिती देण्यात आली. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी नाकाबंदी व गस्तीच्या सूचना दिल्या. गंगापूर पोलिस ठाण्याचे  उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलिस हवालदार गायकर, उगले, पोलिस शिपाई नेटारे, ढगे गस्तीवर असताना उपनगर येथून पोत लांबविणाऱ्या संशयिताच्या वर्णनाचे दोन जण पोलिसांना पाहून दुचाकीवरून पळताना दिसले. संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही संशयितांचा पाठलाग केला. दोन्ही संशयित गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील गोदाकाठावरील जंगलात पळून गेले. या वेळी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन राबवून अजिंक्‍य कदम (वय १८) अनिकेत पाटील (१८, दोघे रा. पंचवटी कारंजा) यांना अटक केली. दोघा संशयितांच्या पंचवटी येथील घराची व एका संशयिताच्या गंगापूर परिसरातील मोबाईल दुकानाची झडती घेण्यात आली. दुकानातून दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, संशयितांना ताब्यात घेण्यात तत्परता दाखविलेले पोलिस उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी अभिनंदन केले.