सराईत गुंडावर टोळक्याचा भरगर्दीत कोयत्याने वार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नाशिक - पंचवटीतील मालेगाव स्टॅंड येथे आज सकाळी सिनेस्टाइल एका सराईत गुन्हेगारावर टोळक्‍याने धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमी सचिन ऊर्फ गणेश दिलीप गायकवाड (वय २४, रा. एरंडवाडी, पेठ रोड) याला त्याच्या आईने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पंचवटी पोलिसांत टोळक्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटी परिसरात गॅंगवारचा भडका उडाला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.  

पंचवटी पोलिसांत विशाल नामदेव वाघेरे (रा. एरंडवाडी, पेठ रोड) याने फिर्याद दिली. सचिन गायकवाड आज सकाळी नऊच्या सुमारास मालेगाव स्टॅंड सिग्नलनजवळच्या पोलिस चौकीपासून पायी जात होता. त्या वेळी संशयित काळ्या ऊर्फ विकी बाळू जाधव याने त्यास रस्त्यात अडविले आणि बोलण्याचा बहाणा करतानाच कुरापत काढली. त्याच्याबरोबरच्या चार-पाच साथीदारांनी अचानक त्याच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सचिन गायकवाड जीवाच्या आकांताने पेट्रोलपंपाच्या दिशेने पळत सुटला. टोळक्‍याने त्याच्या मागे धावत त्याच्या पाठीवर, मानेवर, हातावर धारदार शस्त्राने वार केले. भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि पळापळ झाली. संशयितांनी काही क्षणात पोबारा केला. 

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत सचिनला त्याची आई जिजाबाई गायकवाड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्या छातीवर गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत; परंतु त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध?
जखमी सचिन गायकवाड सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पंचवटी पोलिसांत अनेक गुन्हे आहेत. त्यामुळे त्याच्यावरील प्राणघातक हल्लाही गुन्हेगारीच्या वर्चस्ववादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. दोन आठवड्यांत पंचवटी पोलिस हद्दीत गुन्हेगारी वाढली असून, गुन्हेगार खुलेआम शस्त्रास्त्रे घेऊन फिरत आहेत. गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये अंतर्गत धुसफूस होऊन प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यातूनच किरण निकम याचा खून झाला. त्यानंतरही घटना सातत्याने होत असल्याने पंचवटी पोलिसांची कार्यप्रणाली संशय व्यक्त करणारी आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे भाईंशी थेट संबंध असल्याची चर्चा आहे.