डिजिटल इंडियात असेही ‘स्कूल चले हम’

हिरामण चौधरी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पळसण - सुरगाणा तालुक्‍यातील पळसनजवळील पायरपाडा (प.) हे गाव अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. येथील विद्यार्थी रोज जीव धोक्‍यात घालून भरपुरात नार नदी ओलांडून ज्ञानाजर्नासाठी जातात. जिवावर उदार होण्याच्या या प्रकरणातून या चिमुरड्यांची सुटका व्हावी; पण अधिकाऱ्यांपर्यंत या चिमुरड्यांचा आवाज पोचत नाही, हे दुर्भाग्य आहे. 

पळसण - सुरगाणा तालुक्‍यातील पळसनजवळील पायरपाडा (प.) हे गाव अनेक सोयी-सुविधांपासून वंचित आहे. येथील विद्यार्थी रोज जीव धोक्‍यात घालून भरपुरात नार नदी ओलांडून ज्ञानाजर्नासाठी जातात. जिवावर उदार होण्याच्या या प्रकरणातून या चिमुरड्यांची सुटका व्हावी; पण अधिकाऱ्यांपर्यंत या चिमुरड्यांचा आवाज पोचत नाही, हे दुर्भाग्य आहे. 

पायरपाडा येथील विद्यार्थी पळसन येथील शासकीय आश्रमशाळा व जिल्हा परिषदेच्या शाळेत येण्यासाठी नार नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पोहत पळसनला जातात. अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा हा जीवघेणा संघर्ष सुरू आहे. या गावंना जोडणारे मुख्य गाव पळसन असून येथूनच तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या गावी संपर्क साधावा लागतो. गेल्या पंधरवड्यात सात ते आठ दिवस नार नदी दुथडी भरून वाहत होती. या वेळी येथील सर्व व्यवहार ठप्प होते. एखादा आजारी पडलाच तर त्याला दवाखान्यात नेता येत नाही. एखादा खूपच आजारी पडल्यावर पट्टीच्या पोहणाऱ्या माणसाला शोधून नार नदी पार करून द्या, अशी विनंती करावी लागते, कमरेएवढ्या पुराच्या पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. रुग्णांना डोली करून आणणेही कठीण होऊन बसते. 

येथील लोकसंख्या पाचशेहून अधिक आहे. तरीदेखील पळसनला जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पूल नाही. येथील मुले, मुली व महिला पट्टीच्या पोहणाऱ्या आहेत. असे असले, तरी विद्यार्थ्यांचा हा स्वतःच्याच जिवाशी चालणारा संघर्ष केव्हा संपणार, याकडे तालुक्‍यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे. पहिली ते बारावीपर्यंतची मुले, सुरगाणा येथे येणारे महाविद्यालयीन युवक-युवती यांना रोजच हा संघर्ष करावा लागतो. यापूर्वी पळसन ग्रामपंचायतीतफे नदीपात्रात रस्ता बनवला होता. तोही शेवाळावरून पाय सरकू नये म्हणून परंतु तो त्याच वर्षी पुरात वाहून गेला. मुलांना प्रसंगी पुराच्या पाण्यातून पोहवत किनाऱ्यावर यावे लागते. शालेय गणवेश तर नदीकिनाऱ्यावरच ठेवावा लागतो. ओले झालेले कपडे बदलून या मुलांना शाळेत जावे लागते. या ठिकाणी लोखंडी पूल अथवा मोरीचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे.