फटाक्‍यांच्या आतषबाजीचा धडाका कमी

फटाक्‍यांच्या आतषबाजीचा धडाका कमी

नाशिक - दीपोत्सवाच्या खरेदीला वेग आलेला असताना सायंकाळी वरुणराजाने हजेरी लावण्याचा ठेका धरला होता. त्यातच, महिन्याच्या मध्याला प्रकाशपर्व साजरा होत असताना सुट्यांमुळे कुटुंबीयांनी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला. शाळांमधून पर्यावरणपूरक दीपोत्सवाचा संकल्प करण्यात आल्याने मुलांमध्ये जागृती झाली. उच्च आवाजाच्या फटाक्‍यांच्या खरेदीचा तरुणाईने आखडता हात घेतला. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे, यंदाच्या आनंदपर्वात फटाक्‍यांच्या आतषबाजीचा धडाका कमी राहिल्याचा प्रत्यय साऱ्यांना आला आहे.

कानठळ्या बसविणारे फटाके, धुराचे लोट, अवकाशात उंच जाऊन धुराच्या जोडीला आवाजाची अनुभूती हे चित्र फारसे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे ध्वनी- वायुप्रदूषणाला आळा बसण्यास हातभार लागला आहे. अगोदरच यंदाच्या दीपोत्सवात फटाक्‍यांचा धंदा ६० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत झालेल्या दुकानदारांच्या खपात एस. टी. कामगारांच्या संपाने आणखी घट झाली आहे. भाऊबीजला जाणाऱ्या भावांकडून अडीचशे ते पाचशे रुपयांच्या फटाक्‍यांची खरेदी केली जाते. पण बसगाड्या रस्त्यावरून धावत नसल्याने उद्या (ता. २०) किमान पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंतचा धंदा कसा होणार, या काळजीने दुकानदारांना ग्रासले आहे.

वीस कोटींच्या फटाक्‍यांचा होतो चुराडा
फटाका व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपोत्सवाच्या तीन दिवसांच्या अभ्यंगस्नानाच्या निमित्ताने शहरामध्ये किमान २० कोटींच्या फटाक्‍यांचा चुराडा होतो. पण यंदाचा दीपोत्सव त्यास अपवाद ठरला आहे. उत्सवाच्या काळात दुकान लावून विक्री करावयाची म्हटल्यास किमान पन्नास हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. हा खर्च भरून फायदा व्हावा म्हणून दुकानदार किमान तीन लाखांच्या फटाक्‍यांची विक्री करण्यासाठी उत्सुक असतात.

दीपोत्सव नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये सुरवातीला साजरा होतो. ऑक्‍टोबरमध्ये साजरा होणारा दीपोत्सव अखेरच्या टप्प्यात असल्याने त्याचा खरेदीवर परिणाम होतो. त्यातच यंदा दुकाने उशिरा सुरू झाली. पावसामुळे शहरवासीयांनी कपडे, किराणा, सोने-चांदी आणि मग फटाके खरेदी करणे पसंत केले. शाळांमधून पर्यावरणविषयक जागृती झाली आहे. पूर्वी सर्व कर २८ टक्के द्यावा लागायचा, जीएसटीने तेवढा कर राहिला. पण तीन राज्यांतून फटाक्‍यांच्या गाड्या जीएसटीच्या बिलामुळे अडवल्या गेल्या नाहीत.
- जयप्रकाश जातेगावकर, फटाके विक्रेते

यंदा फटाक्‍यांच्या किमतीत फार वाढ झाली आहे. शिवाय सोशल मीडिया, शाळांमधून फटाक्‍यांविषयी जनजागृती झाली आहे. त्यामुळे यंदा मुलांनी फटाक्‍यांसाठी फारसा आग्रह धरला नाही. फटाक्‍यांमुळे पर्यावरणाचेही नुकसान होत असते. त्यामुळे फक्त पुजेसाठी फटाके खरेदी करून दिवाळी साजरी केली जात आहे. 
- भारती कुशारे, गृहिणी

फटाक्‍यांमुळे प्रदूषण वाढते. शिवाय फटाक्‍यांचा खर्च वाया जातो. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी यंदा कमी आवाजाचे अन्‌ धुराचे मोजक्‍या फटाक्‍यांची खरेदी केली. यापूर्वी मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची खरेदी करत होतो. यंदाच्या फटाक्‍यांच्या वाचलेल्या पैशांमधून गरिबांच्या दीपोत्सवासाठी मदत करणार आहे. 
- किरण शिरसाट, म्हसरूळ

शाळा-महाविद्यालयांमधून फटाक्‍यांमुळे होणारे प्रदूषणाबाबत जनजागृती होत आहे. न्यायालयाने फटाक्‍यांच्या आवाजाबाबत निर्बंध घातलेले आहेत. सामाजिक संघटनांनीसुद्धा फटाक्‍यांबाबत प्रबोधन केल्याने फटाक्‍यांच्या विक्रीवर परिणाम झालाय. 
- पुष्पकराव मोगल, पंचवटी

फटाक्‍यांमुळे प्रदूषणात भर पडून त्याचा तोटा माणसांना होतो. याबद्दलची माहिती मुलांप्रमाणेच तरुणांपर्यंत पोचली. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे, तरुणाईमध्ये कानठळ्या बसणाऱ्या, धुराचे लोट हवेत सोडणाऱ्या फटाक्‍यांकडे फारसा कल खरेदीवेळी पाहावयास मिळाला नाही.
- प्रज्ञा पोरजे, गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com