'वर्तमानकाळात युवकांना होऊ द्या अभिव्यक्त'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

आज समारोपाच्या सत्रात
स. १० ते १२.३० ः जाहीरनाम्याचे वाचन व त्यावर युवकांचे भाष्य (खुले सत्र).
दु. १२.३० ते १.१५ ः डॉ. गणेश देवींच्या उपस्थितीत समारोप.

नाशिक - आजच्या वर्तमान स्थितीत युवकांना व्यक्त होता येत नाही, त्यामुळे त्यांना प्रथम अभिव्यक्त होऊ द्या. त्यांच्या अभिव्यक्त होण्यातून काय निष्पन्न होईल, याची अपेक्षा न ठेवता त्यांना बोलते करा. कारण युवक अभिव्यक्त झाला तरच त्याचे विचार समोर येऊन त्याचा उपयोग सक्षम समाजाच्या निर्मितीसाठी होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक व दक्षिणायनचे प्रणेते डॉ. गणेश देवी यांनी आज केले.

पाच वर्षांपूर्वी राज्य शासनाने तयार केलेल्या युवकांविषयी धोरणाला यंदा पाच वर्षे पूर्ण होत आहेत, तसेच नाशिकचे साहित्यिक दैवत कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तरुणांच्या विचारमंथनाचा कार्यक्रम नाशिकमध्ये घेण्याचे निश्‍चित झाले अन्‌ नाशिकमधील दोनदिवसीय युवकांच्या संमेलनावर शिक्कामोर्तब झाले. गंगापूर रोडवरील विश्‍वास लॉन्सवर दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळच्या सत्रात दहा ते दुपारी एकदरम्यान गटचर्चा झाल्यावर एक ते दीडदरम्यान गटचर्चेचा गोषवारा मांडण्यात आला. या दोनदिवसीय संमेलनाचे औपचारिक उद्‌घाटन आज डॉ. देवी यांच्या हस्ते झाले. 

दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत गटचर्चेच्या गोषवाऱ्याचे सादरीकरण करण्यात आल्यावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विद्या बाळ, कुमार शिराळकर व डॉ. गणेश देवी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आज युवकांमधील विविध प्रश्‍नांनी गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. त्यामुळे या प्रश्‍नांवर चर्चा-संवाद होणे गरजेचे आहे. दुदैवाने ही संवादप्रक्रिया संपत चालली आहे. देशातील दारिद्य्राचे मुख्य कारण शेतीक्षेत्राच्या ऱ्हासात आहे. दुष्काळ, महापूर, गारपीट यामुळे कृषिक्षेत्रापुढे आव्हान निर्माण झाले असून, शेतीशी निगडित युवावर्गाला समजून घेणे गरजेचे आहे. भारत, चीन या दोन्ही शक्ती एकत्र आल्यास अमेरिकेची दादागिरी संपू शकते, असे ते शेवटी म्हणाले. सायंकाळी सहा ते साडेआठच्या सत्रात ‘समाजस्वास्थ्य’ नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. रात्री आठला अतुल पेठे यांच्याशी संवादाचा कार्यक्रम झाला. कुमार शिराळकर यांनी संमेलनामागील भूमिका विशद करताना ७५ वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या विशाखा काव्यसंग्रहाबाबत उपस्थितांना माहिती दिली. आज झालेल्या युवकांच्या चर्चेतून एकत्र आलेल्या मुद्द्यांद्वारे युवकांचा जाहीरनामा तयार करतील. उद्या या जाहीरनाम्याचे सामूहिक वाचन केले जाणार आहे.

ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ यांनी तरुणांना संघर्ष करण्याचा सल्ला देतानाच बदल करावयाचे असतील तर स्वतःपासून करण्याचा आग्रह धरला. विचार करून विवेकाची कास धरण्याचे आवाहनही त्यांनी केले. संवादासारखे दुसरे माध्यम नसल्याने लोकशाहीचे प्रशिक्षण घरापासूनच सुरू व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

‘पुन्हा एकदा करा सत्यशोधनाचा निर्धार’
ज्या काळात स्त्री-पुरुष समानता हा विचारही कोणाच्या मनात नव्हता, जेव्हा स्वातंत्र्य मिळण्याची कोणतीही शक्‍यता वाटत नव्हती, त्या काळात महाराष्ट्रात सत्यशोधक चळवळीचा जन्म झाला. हल्ली इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडियासह वर्तमानपत्रेही ‘फेक न्यूज’ देण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे युवावर्गावरील जबाबदारी वाढली असून, पुन्हा एकदा सत्यशोधनाचा निर्धार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन डॉ. गणेश देवी यांनी केले.

Web Title: nashik news dr ganesh devi