हा तर भ्रष्टाचार जोड प्रकल्प  - डॉ. राजेंद्रसिंह

हा तर भ्रष्टाचार जोड प्रकल्प  - डॉ. राजेंद्रसिंह

नाशिक  - नदीजोड नव्हे हा तर भ्रष्टाचार जोड प्रकल्प आहे, अशा शब्दांमध्ये जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी आज येथे सरकारवर टीकास्त्र सोडले. नाशिक, नगर, मराठवाडा आणि खानदेश या दुष्काळी भागाला महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी करताना गुजरातमध्ये पाणी असताना महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा प्रश्‍न उद्‌भवत नाही, अशीही भूमिका त्यांनी मांडली. 

नदीजोड प्रकल्पाबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. सिंह म्हणाले, ""नेत्यांच्या डोळ्यांतील पाणी आटल्याने त्याच्या झळा दुष्काळी भागाला बसत आहेत. महाराष्ट्राने पाण्याची उपयोगितता वाढवण्याचे स्वप्न पाहायला हवे. नदीशी ठेकेदार आणि कंपन्यांना जोडण्याऐवजी सरकारने समाजाला जोडावे. त्याच वेळी नदी तलावांना जोडण्याचा विचार करावा. परंतु, मुळातच समाजामध्ये पाण्याविषयीची सजगता वाढल्यावर दुष्काळाबरोबर पूरपरिस्थितीला चांगले उत्तर मिळेल. त्यामुळेच राज्याला पाणीदार बनवण्यासाठी ठेकेदारांचे वर्चस्व सरकारला रोखावे लागेल. गुजरात हे राज्य माझ्या देशातील असले, तरीही महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचा विचार मला महत्त्वाचा वाटतो.'' 

""ठेकेदारांकडून प्रकल्पाची किंमत फुगवली जाते. मग त्या आधारे सविस्तर प्रकल्प अहवाल केला जातो. त्याला नेत्यांकडून मान्यता मिळते. सरकारी यंत्रणा अंमलबजावणी करते आणि प्रत्यक्ष काम ठेकेदार करतो. ही साखळी खंडित करणे आवश्‍यक आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर जगभर अपयश आलेल्या आणि सामाजिक स्थिती विस्कटलेल्या नदीजोड प्रकल्पाचा आग्रह धरला जाऊ नये,'' असे ते म्हणाले. 

साधुबाबा राज्यकर्त्यांना मिळाले आहेत 
""गोदावरी त्र्यंबकेश्‍वरमधील ब्रह्मगिरी पर्वतामध्ये उगम पावली आहे. या ठिकाणी गोदावरी बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे तिला संपवण्याचे कारण नाही. पण साधुबाबा राज्यकर्त्यांना मिळाले असल्याने कॉंक्रिटीकरण होत आहे. समाजाची गरज म्हणून गोदावरीचे प्रदूषण, अतिक्रमण आणि शोषण कसल्याही परिस्थिती रोखले जावे,'' अशी आग्रही मागणी डॉ. सिंह यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com