मखमलाबाद - येथील ब्रिटिश काळातील पहिली शाळेची इमारत.
मखमलाबाद - येथील ब्रिटिश काळातील पहिली शाळेची इमारत.

शैक्षणिक संकुलांमुळे ज्ञानगंगा पोचली घरोघरी

गाव आणि गावपण... हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः गावात लहानाचे मोठे झालेले नोकरी-व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्ताने देश-विदेशात गेलेले नागरिक आपल्या गावाबद्दलची आत्मीयता, प्रेम त्यांच्या मनात कायम असते. गावाचा आठवडे बाजार, सण-उत्सव साजरे करण्याची न्यारी रित. ही मंडळी गावातील संस्कृती, परंपरा जपण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतात. महापालिकेत समाविष्ट असलेली २३ खेडीही आपले वेगळेपण जपत आहेत. काही गावांत शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा यांसारख्या प्रश्‍नांची सोडवणूक झाली, तर काही गावांचे प्रश्‍नही ‘जैसे थे’ आहेत. गावाचे गावपण जपणाऱ्या २३ खेड्यांच्या परिचयानंतर आता त्यांच्या प्रश्‍नांवर प्रकाशझोत टाकण्याचा आजपासून हा प्रयत्न...

मखमलाबाद नाशिकपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर असलेले छोटेसे खेडेगाव आज शहराला येऊन भिडले आहे. गावात अठरापगड जातीचे लोक, पण त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पूर्वी हे गाव पेरूसाठी प्रसिद्ध होते. पुढे त्याची जागा द्राक्षबागांनी घेतली. धार्मिकवृत्ती जोपासणारे गाव असल्याने गावात अखंड हरिनाम सप्ताह, भजन-कीर्तन, दिंड्या, पारायण यांसारखी धार्मिक कार्यक्रमांची नेहमीच रेलचेल राहिलेली आहे. सर्वच बाबतींत आदर्श असलेल्या या गावाने शिक्षणातही आघाडी घेतली आहे.

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शैक्षणिक संकुलामुळे ज्ञानगंगा अर्थात, शिक्षणाचे हे कार्य मखमलाबादकरांसोबतच आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे. विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. असे असले, तरी आयटीआय, नर्सिंग, कृषी, बी.एड., डी.एड. यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सोय असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

मखमलाबादमध्ये पूर्वी फक्त सातवीपर्यंत शिक्षणाची सोय होती. त्यानंतर १९६२ मध्ये (कै.) पोपटराव पिंगळे, (कै.) टी. ए. काकड, आर. ए. काकड यांच्यासह गावातील मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी विद्यालयाची स्थापना केली. सुरवातीला काही दिवस मारुती मंदिर, राममंदिर या ठिकाणी शाळा भरत होती. नंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन खासगी घरे भाड्याने घेत हा ज्ञानयज्ञ पुढे तेवत ठेवला. त्यानंतर गावठाणातील साडेपाच एकर जागा शाळेसाठी देण्यात आली. ‘मविप्र’, तसेच लोकवर्गणीतून या ठिकाणी इमारत बांधण्यात आली. मंदिरात सुरू झालेली ही शाळा स्वतःच्या जागेत भरायला लागली. पुढे हळूहळू त्याचा विस्तार होत गेला. 

गावोगावी अद्ययावत सुविधा उपलब्ध
मखमलाबाद येथील शाळेत शिक्षण घेण्यासाठी दरी, मातोरी, ढकांबे, आशेवाडी, रासेगाव, म्हसरूळ, मुंगसरा, दरी, मातोरी अशा विविध ठिकाणांहून विद्यार्थी येतात. अकरावी आणि बारावीचे कला, वाणिज्य व विज्ञान अशा तिन्ही शाखांचे शिक्षण येथे दिले जात आहे. २००९ पासून कला व वाणिज्य शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षणही याच प्रांगणात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. याच संकुलात होरायझन शाळेचीही शाखा आहे. यात लहान गटापासून ते तिसरीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. कला आणि क्रीडाक्षेत्रातही संस्थेचे नाव मोठे आहे.

चित्रकलेतही मुलांनी राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके मिळविली आहेत. ‘मविप्र’च्या शाळेबरोबरच गावालगतच नारायणराव मानकर प्राथमिक विद्यालय आहे. लहान गटापासून ते चौथीपर्यंत तेथे शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. इंग्रजी माध्यमाचेही काही वर्ग या ठिकाणी चालत असल्याने लहानग्यांची चांगली सोय झाली. कर्मवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचेही आदर्श प्राथमिक विद्यामंदिर गावात आहे. या ठिकाणीही चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते.

शैक्षणिक संस्थांची गावाशी जोडली नाळ
आजमितीस ‘मविप्र’ संस्थेचे शैक्षणिक संकुल या ठिकाणी आहे. यात बालवाडी, लहान गट, मोठा गट अशी लहान मुलांच्या शिक्षणाची सोय आहे. इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांसाठी अभिनव बालविकास मंदिर याच ठिकाणी आहे. माध्यमिक शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी तसेच अकरावी व बारावीच्या वर्गांसाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आहे. येथे सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी आज शिक्षण घेताहेत. मराठी आणि सेमी इंग्रजी असे दोन्ही माध्यमाचे शिक्षण येथे दिले जाते. निकालाची चांगली परंपरा असल्याने विद्यार्थ्यांचा ओढाही याच शाळेकडे असल्याचे दिसून येते. 

या आहेत अपेक्षा...
‘मविप्र’च्या प्रांगणात सुसज्ज संगणक कक्ष असावेत 
डिजिटल क्‍लासरूम असाव्यात
‘मविप्र’ प्रांगणात विद्यार्थिसंख्या जास्त असल्याने इमारत कमी पडते. इमारतीचा
विस्तार होणे आवश्‍यक
महापालिका शाळांना सुरक्षारक्षक असावेत 
गावात बी.ए., बी. कॉम.पर्यंत सोय आहे. बी.एस्सी.ची सोय नाही
मखमलाबाद गाव व परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय नाही  
कृषीचे शिक्षण देण्याची व्यवस्था असावी

महापालिकेच्या शाळाही जपताहेत वेगळेपण
महापालिकेच्याही या ठिकाणी दोन शाळा आहेत. शाळा क्रमांक ८६ मध्ये मुलांसाठी, तर शाळा क्रमांक ८७ मध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय आहे. शाळा क्रमांक ८६ ब्रिटिशकाळापासून होती. नंतर पुढे जिल्हा परिषदेकडे या शाळेचे कामकाज होते. त्यानंतर १९८१ मध्ये शाळा क्रमांक ८७ ची स्थापना झाली. महापालिकेत २३ खेड्यांचा समावेश झाल्यानंतर ८६ आणि ८७ या दोन्ही शाळांचे कामकाज महापालिकेतर्फे चालविले जाते. महापालिकेतर्फे सुसज्ज इमारत बनविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. येत्या दिवाळीपर्यंत नवीन इमारतीत शाळा भरण्याची चिन्हे आहेत. सुमारे आठशे विद्यार्थी येथे शिक्षण घेताहेत. कामगार वस्ती असलेल्या अश्‍वमेधनगरमध्ये १०३ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेच्या इमारतीचा प्रश्‍न मार्गी लागणे आवश्‍यक आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची सोय असली, तर उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देण्याचीही व्यवस्था असावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

गावठाणाच्या विकासाबाबत आज बैठक
गावठाणातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता. १९) बैठक होणार आहे. ही बैठक सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद येथे सायंकाळी सातला होईल. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, नगरसेविका सुनीता पिंगळे, नगरसेवक पुंडलिक खोडे, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र काकड यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित राहतील.

मखमलाबाद गावात विविध जातिधर्माचे लोक राहत असले, तरी सामाजिक कार्यात सर्वजण एकत्र येऊन काम करतात. गावातील लोकांनीच पुढाकार घेऊन गावात चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. गावात शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्यांवर पोचले. गावात ४८ वर्षे जुने वाचनालय आहे. त्याचठिकाणी अभ्यासिकाही चालविली जाते. 
- रामचंद्र काकड

मखमलाबादला आज प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची चांगली सोय आहे. तरी उच्च शिक्षणाच्याही सोयी असायला हव्यात. कृषी, आयटीआय, परिचारिका, बी.एड., डी.एड. यांसारखे रोजगाराभिमुख शिक्षणाच्या सोयी असल्या पाहिजेत. त्यामुळे शिक्षणाबरोबरच रोजगारवाढीलाही चालना मिळेल. 
- रमेश पिंगळे

मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या या प्रांगणात बालवाडीपासून ते पदवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. आजूबाजूच्या अनेक गावांतून मुले शिक्षणासाठी येतात. सुसज्ज संगणक लॅब असणे आवश्‍यक आहे. निकालाची परंपरा शाळेने नेहमी जोपासली आहे. 
- एस. टी. आथरे, प्राचार्य, छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

मखमलाबाद, तसेच आजूबाजूचा परिसर हा शेतीने व्यापलेला आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे कृषीविषयक शिक्षण देणारी संस्था गावात असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेतीला तर होईलच, शिवाय रोजगारासाठीही होऊ शकतो. 
- सुनीता पिंगळे, नगरसेविका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com