मराठी चित्रपटांतूनच करायचंय मनोरंजन - पूजा सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

नाशिक - सिनेसृष्टीत काम करताना मराठी चित्रपटातील भूमिकांचा अनुभव आनंददायी राहिला आहे. हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांबाबत विचारणा होत असली तरी मराठी चित्रपटातूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची इच्छा असल्याचे अभिनेत्री पूजा सावंत हिने सांगितले.

गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात धन्वंतरी इस्टिट्यूट ऑफ डिझाईन ॲन्ड टेक्‍नॉलॉजी (डीआयडीटी)तर्फे झालेल्या शैक्षणिक सत्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी ती बोलत होती. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन, डॉ. प्रा. राजेंद्र वडनेरे, प्रा. राम ठकार, ‘धन्वंतरी’च्या संस्थापिका सरोजताई धुमणे, कार्यकारी संचालिका मनीषा बागूल, प्राचार्य अनिल बागूल उपस्थित होते.

पूजाने आठवणींना उजाळा दिला. ‘दगडी चाळ’ या चित्रपटाला नाशिकमधून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे सांगून नाशिककर प्रेक्षकांचे तिने आभार मानले. फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र विस्तारलेले आहे. विशेषत: मुलींसाठी या क्षेत्रात चांगल्या संधी असून, मुलींनी शिक्षण घेऊन सिनेसृष्टीत यावे, असे आवाहनही तिने केले.

गतवर्षी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार झाला. प्रा. प्रांजल पाठक यांनी पूजा सावंतसोबत मुक्तसंवाद साधला. प्रा. अनिल बागूल यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मृण्मय दत्ता यांनी सूत्रसंचालन केले. देवयानी भावसारने स्वागतगीत सादर केले. प्रा. नूतन भागवत यांनी आभार मानले.