लोकांच्या तक्रारी असतानाही ठेकेदाराला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

नाशिक -  शहरातील बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांनी वर्षापासून खासगी ठेकेदार नेमून टोईंग कारवाईस सुरवात केली. ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने नवीन ठेका देण्यासाठी ऑनलाइन निविदाप्रक्रिया राबविली. मात्र, नियमांची पूर्तता करण्यात एकही ठेकेदार यशस्वी न झाल्याने टोईंगसाठी नवा ठेकेदार मिळेनासा झाला आहे. नागरिकांच्या तक्रारी असतानाही जुन्याच ठेकेदाराला तीन महिन्यांपासून सतत मुदतवाढ दिली जात आहे.

पोलिस आयुक्तालयाने फेब्रुवारी २०१६ मध्ये खासगी ठेकेदारास शहरातील वाहनांची टोईंग करण्याचा ठेका दिला. वर्षभरासाठी ठेकेदाराला दिलेल्या ठेक्‍याची मुदत जानेवारी २०१७ मध्येच संपली. त्याचवेळी शहरात महापालिका निवडणुकीचे वारे वाहत असल्याने त्याच ठेकेदारास तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्या तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यानंतर मात्र पोलिस आयुक्तालयाने ई-निविदा प्रसिद्ध करून वाहतूक ठेकेदारांना आवाहन केले. परंतु गेल्या तीन-साडेतीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिस शाखेकडे ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळालेला नाही. एकही निविदा आलेली नाही. 

ई-निविदेमध्ये काही अटी, शर्तींची पूर्तता निविदा दाखल करणाऱ्या ठेकेदारांना करणे आवश्‍यक आहे. त्यामध्ये ठेकेदारीचा पूर्वानुभव असणे आवश्‍यक आहे. याच अटीमुळे वाहतूक ठेका घेण्यास अनेक अपात्र ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिस शाखेला नवीन ठेकेदार मिळेनासा झाला आहे. परिणामी, तिसऱ्यांदा ई-निविदेसाठी जाहिरात देण्याची वेळ पोलिस आयुक्तालयावर आली आहे. लवकरच नवीन ठेकेदाराला टोईंगचा ठेका दिला जाईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केला. अलीकडे टोईंगवरूनही वादावादी होत असताना ठेकेदार नियमांचे उल्लंघन करून वाहनांची टोईंग करीत असल्याचे आरोप वाहनचालकांनी केले आहेत.