भाजप सरकार खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय देणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सटाणा - राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी भाजप सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आघाडी शासनाने त्यांच्या कार्यकाळात कर्जमाफीचे केवळ राजकारणच केले असून, आता भाजप शासन खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना न्याय देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल येथे केले. 

खासगी कामानिमित्त साक्री (जि. धुळे) येथे जात असताना रयत शेतकरी संघटनेचे संजय वाघ शिरसमणीकर यांच्या विनंतीवरून कृषी राज्यमंत्री खोत यांनी आज सायंकाळी पाचला येथील समको बॅंकेस भेट दिली. सटाणा बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे व शिरसमणीकर यांनी श्री. खोत यांचे स्वागत केले.

या वेळी बाजार समिती सभापती रमेश देवरे यांनी शासन व प्रशासनाच्या कांद्याबाबत भूमिकेसंदर्भात श्री. खोत यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी श्री. खोत म्हणाले, नाशिक जिल्हा हा शेतकरी आंदोलनाचा जिल्हा आहे. शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन या जिल्ह्याने केल्यामुळेच आंदोलन यशस्वी झाले. भाजप सरकारच्या काळातच शेतकरी खऱ्या अर्थाने कर्जमुक्त होणार आहे. शेतकऱ्याकडे आता 25 ते 30 टक्के कांदा शिल्लक असून, बऱ्याच दिवसांनंतर कांद्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकार यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही. कांदा व्यापारी वर्गात घबराट निर्माण होईल, असे वातावरण तयार करून कांद्याचे भाव कोसळतील असे काम करू नये, अशा सूचनाही श्री. खोत यांनी या वेळी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून दिल्या. 

या वेळी बागलाण तालुका अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलातर्फे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे संचालक छोटू जगताप, उपाध्यक्ष लखन पवार व भावसिंग पवार यांनी श्री. खोत यांचा सत्कार केला. समको बॅंकेचे अध्यक्ष शरद सोनवणे, संचालक कैलास येवला, पंडितराव अहिरे, रवींद्र पवार, कुबेर जाधव, लखन पवार, सुनील निकम, श्रीकांत रौंदळ, माणिक निकम, परशुराम अहिरे, शांताराम बधान आदी उपस्थित होते.