म्हणे मी लाभार्थी...; लाभार्थी फक्त १०८ !

म्हणे मी लाभार्थी...; लाभार्थी फक्त १०८ !

येवला (नाशिक) : अनेक योजनांच्या जाहिरातीत होय मि लाभार्थी असे ठराविक लोक घेऊन सरकार आपले कौतुक मिरवत आहे पण अशाच अनेक योजनांमधील अनेक लाभार्थ्यांना प्रतीक्षा करून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्याचे काय असा सवालही या जाहिरातीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. कांद्याचे आगार असलेल्या येवल्यात यावर्षी तब्बल २ हजार ९०० शेतकऱ्यांनी कांदा चाळीसाठी अर्ज केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात फक्त एकशे आठ शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून, उर्वरितांना पुन्हा नव्याने नव्या वर्षी नशीब जावे लागणार आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा साठविण्यासाठी कांदाचाळींची योजना राबविली जाते. विशेषत जिल्ह्यासाठी कांदाचाळी मोलाची भूमिका बजावत शेतकऱ्यांना अधिक चार पैसे मिळवून देत आहे, मात्र उत्पादन व साठवणुकीच्या प्रमाणात कांदा चाळी मंजूर होत नसल्याने अनेक शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. त्यातच अनेक जाचक अटी पार करून मिळणारे अर्थसाह्य हेदेखील कमी पडत असल्याने शेतकर्यांना वाढत्या महागाईमुळे स्वतः काही खर्च करून चाळी पूर्ण कराव्या लागतात. २०१६-१७ मध्ये तालुक्यात चाळीसाठी ५५४ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर उद्दिष्ट मात्र १०३ एवढे असताना कृषी विभागाने १०९ शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे. यातील ८१  शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेले असून उर्वरीत अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.

चाळीचे उद्दिष्ट वाढवून द्या..!
चालू वर्षी मात्र चाळीत साठवलेल्या कांद्याला सोन्याच्या दरात भाव मिळत असल्याने भविष्यात आपणही कांदा साठवावा या अपेक्षेने शेतकऱ्यांनी या योजनेतून कांदा चाळीचा लाभ मिळविण्यासाठी कृषी विभागाचे उंबरठे झिजवले मात्र एवढा आटापिटा करूनही अनेकांच्या हातावर तुरीच मिळाल्या आहेत.तालुक्याला यावर्षी फक्त १०८ चाळीचे उद्दिष्ट देण्यात आले असून मागणी अर्ज मात्र २ हजार ९०० इतक्या शेतकऱ्यांचे आलेले आहे. १०८ पैकी ८५ शेतकऱ्यांना कृषी विभागाने कामांसाठी पूर्व संमती दिली आहे तर अनुसूचित जाती व जमातीचे लाभार्थी अर्ज नसल्याने उर्वरितांना लाभ देता आलेला नाही. अधिक कांदा पिकवला जात असल्याने लाभार्थी उदिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.  

५ ते २५ मेट्रिक टन क्षमतेलाच अनुदान
हमखास पैसे मिळवुन देणाऱ्या कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरीक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे यासाठी चाळींमध्ये साठवणूक करुन कांद्याचे आयुष्य वाढविता येते. काढणीपश्चात साठवणूकी दरम्यान होणारे नुकसान कमी करण्यासाठी शासन अनुदान देते. कांदाचाळी बांधण्यासाठी साडेतीन हजार प्रति मेट्रिक टन याप्रमाणे ५ ते २५ मेट्रिक टन क्षमतेपर्यंतच्या चाळींसाठी क्षमतेनुसार व जास्तीत जास्त ८७ हजार ५०० रुपयापर्यत अर्थसहाय्य देण्यात येते.

हे आहेत पात्र लाभार्थी :
सदर योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी,शेतकयांचा गट,शेती माल उत्पादक,ग्राहक,भागीदारी,मालकी कंपन्या, स्वयंसहायता गट,शेतकयांचे उत्पादक संघ कंपन्या,सहकारी संस्था,सहकारी पणन संघ,स्थानिक संस्था,कृषि उत्पन्न बाजार समिती,पणन मंडळ यांना मिळतो. लाभासाठी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर सातबारावर कांदा पिकाची नोंद,चाळीची जागा अर्जदाराच्या स्वत:च्या मालकीची असणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com