शाळांमध्ये परदेशी भाषांची विद्यार्थी गिरवताहेत बाराखडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नाशिक - Hallo ! guten morgen अशा जर्मन शब्दांत जेव्हा विद्यार्थी आपल्या ज्ञानाची कवाडे सातासमुद्रापार नेत आहेत तेव्हा शिक्षणातील परदेशी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शहरातील इंग्रजीच नव्हे, तर मराठी माध्यमांतील अनेक शाळांनी परदेशी भाषा शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

नाशिक - Hallo ! guten morgen अशा जर्मन शब्दांत जेव्हा विद्यार्थी आपल्या ज्ञानाची कवाडे सातासमुद्रापार नेत आहेत तेव्हा शिक्षणातील परदेशी भाषेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शहरातील इंग्रजीच नव्हे, तर मराठी माध्यमांतील अनेक शाळांनी परदेशी भाषा शिकविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

जून सुरू झाला आणि विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना अपग्रेड करण्याकडे शाळांचा कल वाढला. यात प्रामुख्याने परदेशी भाषा शिकविण्याचा ट्रेन्ड वाढत आहे. शहरात इंग्रजी माध्यमेच नाही, तर मराठी माध्यमांनीदेखील विविध परदेशी भाषा विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी खास तासिका आखल्या आहेत. शहरात प्रामुख्याने फ्रेंच आणि जर्मन या भाषांना प्राधान्य देण्यात येत आहेत. फ्रेंच भाषा ही साहित्य प्रकारात, तर जर्मन भाषा ही ऑटोमोबाईल, इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तेथे पुढील शिक्षण किंवा नोकरी करायची असेल, तर ती भाषा येणे ही अट त्या त्या देशांनी सक्तीची केल्याने ही भाषा ज्यांना अवगत आहे त्यांना परदेशी शिक्षण, नोकरी अशा संधींसाठी खूपच फायदा होतो. 

का वाढते परदेशी भाषांचे महत्त्व
परदेशात शिक्षण, नोकरी मिळणे सोपे 
कॉल सेंटर, आयटीत नोकरी 
दुभाषींचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतेय 
भारताचे व्यापारी संबंध वाढल्याने नवीन संधी 
इंटरनेटच्या जाळ्यामुळे वाढलेले भाषेचे महत्त्व 

प्रायोगिक तत्त्वावर आम्ही जर्मन भाषा विद्यार्थ्यांना शिकविण्यास सुरवात केली आहे. संस्थेने स्वतःच्या खर्चात विनामूल्य शिकविण्यास प्रारंभ केला आहे. विद्यार्थ्यांनीदेखील उत्साह दाखविला आहे. 
- प्रकाश वैशंपायन, अध्यक्ष- दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक 

लहान वयात नवी भाषा शिकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात. त्यामुळे भाषेचा प्रयोग रोजच्या वापरात करून ते मजा घेत शिकतात.  
- तृप्ती जोशी, जर्मन शिक्षिका  

माझी मुलगी विज्डम हायमध्ये फ्रेंच भाषा शिकत होती. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यांत ती फ्रेंच भाषेत पहिली आली.
- प्रशांत पाटील, पालक