गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नाशिक - गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी यंदा एक खिडकी योजना लागू करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी आज जाहीर केला. मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

नाशिक - गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी यंदा एक खिडकी योजना लागू करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी आज जाहीर केला. मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकण्यासाठी महापालिका मुख्यालयात झालेल्या मंडळांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. महापालिकेने अनामत रक्कम कमी करावी, मिरवणूक मार्गातील वीजखांब काढावेत, खड्डे बुजवावेत, निर्माल्य कलश वाढवावेत, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना राबविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. महापौर भानसी यांनी त्यानुसार कार्यवाहीच्या सूचना दिल्या. गणेश मंडळांना परवानग्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याच्या सूचनेचा विशेष उल्लेख करण्यात आला. गणेशोत्सवात निर्माल्य संकलनासाठी जादा निर्माल्य कलश व कृत्रिम तलाव तयार करावेत, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. मंडळांतर्फे लक्ष्मण धोत्रे, हेमंत जगताप, महेश बर्वे, सत्यम खंडाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. सभागृह नेते दिनकर पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका प्रियंका माने, शाहिन मिर्झा, शहर सुधार समिती सभापती भगवान दोंदे, नगरसेवक मच्छिंद्र सानप, रवींद्र धिवरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, नगरसेविका पूनम सोनवणे, प्रियंका घाटे, प्रतिभा पवार, भाग्यश्री ढोमसे, सलीम शेख, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय बांबळे, वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन घुमरे आदी उपस्थित होते. गोपीनाथ हिवाळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.