ऐतिहासिक वारसा लाभलेला शिवार बनलाय ‘टुरिस्ट-बिझनेस हब’ 

ऐतिहासिक वारसा लाभलेला शिवार बनलाय ‘टुरिस्ट-बिझनेस हब’ 

आनंदवली, गोवर्धन, गंगापूर अशी गटग्रामपंचायत होती. १९५७ मध्ये गंगापूर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. गोपाळ विश्राम पाटील गंगापूरचे पहिले सरपंच. नंतर धोंडू मुकुंदा पाटील, मुरलीधर देवराम पाटील यांनी सरपंचपद भूषविले. मुरलीधरअण्णा नाशिक पंचायत समितीचे सभापती झाले आणि दोन वर्षांचा सरपंचपदाचा कालावधी शंकर परसराम पाटील यांना मिळाला. नंतर गंगापूरचा समावेश  महापालिकेत झाला. 

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पिंपळगाव बहुला ते गंगापूर वॉर्डमधून अपक्ष म्हणून लता दिनकर पाटील निवडून आल्या. १९७७ मध्ये शिवाजीनगर ते गंगापूर वॉर्डमधून दशरथ पाटील नगरसेवक झाले. २००२ ला त्या प्रभागातून दशरथ पाटील, सुरेश गायकवाड, शोभा दोंदे निवडून आले आणि दशरथ पाटील महापौर झाले. महापौर झाल्यावर दशरथ पाटील यांनी रुग्णालय, रस्ते, पाणी अशी कामे केली. २००७ मध्ये आनंदवली-गंगापूरमधून इंदुमती अरुण काळे यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले. २०१२ मध्ये गंगापूर ते नरसिंहनगर परिसराचे विलास शिंदे नगरसेवक झाले. त्यांच्या काळात पायाभूत सुविधांची कामे झाली. २०१७ च्या निवडणुकीत विलास शिंदे यांची नगरसेवक म्हणून फेरनिवड झाली. इथल्या पाटील घराण्यांमध्ये मुकुंदा दादा पाटील, त्र्यंबक भिका पाटील, नाना भिवजी पाटील, विश्राम गणपत पाटील, धोंडू पुंजा पाटील, रुंजा हरी पाटील, बळवंत सावळीराम पाटील, देवराम नारायण पाटील यांचा समावेश आहे. जिरे माळी कुटुंबात शेटीबा महादू ताठे यांचा समावेश होता. शेती करणाऱ्या दलित बांधवांमध्ये महादू अण्णा जाधव, भीमरावजी जाधव, गणपत नमजी जाधव, नामदेव सीताराम जाधव, सहादू दशरथ जाधव, सुदामा जाधव, बबन जाधव, काळू जाधव, नामदेव जाधव, गंगाराम जाधव, कचरू जाधव, मोहन जाधव अशी कुटुंबे होती. महादू निंबाकर, यसू निंबाकर, शंकर डंबाळे, संतू खेटरे, पुंजा जाधव आदिवासी, ब्राह्मण समाजातील महादेव नाकील, गोपाळ नाकील आणि चर्मकार समाजातील देवजी सातपुते, शिंपी बांधवांमध्ये नारायण सोनवणे, विठ्ठल भांबिरे, गोपाळ शिंदे, गोविंद सोनवणे, विश्‍वनाथ सोनवणे, त्र्यंबक रकटे, तेली समाजात माजी महापौर ॲड. यतीन वाघ यांचे आजोबा यादवराव वाघ, पंढरीनाथ केदार, आत्माराम गायकवाड, रामचंद्र कोरडे, बाळाजी शिरसाठ यांच्यासह शंकर भिका लोहार, दादा वाघ, केरू वाघ, भीमा कहार, धोंडू कहार, परसराम करंजकर, दत्तू जाधव, रघुनाथ सुतार, गिरजा उन्हाळे, आबा उन्हाळे, रामचंद्र मुदगल यांचेही कुटुंब गावात असल्याचे ज्येष्ठ अभिमानाने सांगतात. पेशव्यांच्या वास्तव्यामुळे गोदावरी काठावर घाट, मंदिरे झाल्याचे सांगत नारायण सोनवणे यांचा वाडा सरदार रास्तेंचा होता, अशीही माहिती सांगण्यात आली. पूर्वी गंगापूर-गोवर्धन शिवारात दोन हजार एकर शेती केली जायची. त्यात जिरायती गहू, हरभरा, ज्वारी, रब्बीत बाजरी, नाचणी, उडीद, मूग, तूर ही पिके घेतली जायची. बागायती क्षेत्र शंभर एकरापर्यंत होते. त्यात घास, टोमॅटो, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जायचे. भाजीपाला भद्रकाली, महात्मा फुले मार्केट आणि गोदाकाठ अशा तीन ठिकाणी विकायला जायचा. उन्हाळ्यात आंब्याच्या हंगामाने गोडीत भर पडत होती. 

सातपूर औद्योगिक वसाहत झाल्यानंतर रोजंदारी उपलब्ध झाली आणि शेतातील कामासाठी मजूर मिळणे मुश्‍कील झाले. त्यावर उपाय म्हणून शेतकरी कुटुंबाने शेतीत राबण्यास सुरवात केली. १९५९ मध्ये विकास सोसायटीची स्थापना झाली. धोंडू पाटील पहिले अध्यक्ष. १९५० पासून पाटील, कोकणी, ताठे, साळेकर, जोंधळे, गुप्ते यांचे द्राक्षांची मळे होते. पेरूच्या बागाही होत्या. आता याच शिवारातील लोकसंख्या १२ हजारांच्या पुढे पोचली आहे. एचएएल कॉलनी, इडन गार्डन, हनुमाननगर, सुवर्णनगर, शिवसृष्टीनगर, कोरडेनगर, ध्रुवनगर, शिवाजीनगर असा विस्तार झाला. पूर्वीला असलेला बेंडकोळी नाला, पश्‍चिमेला गोवर्धन, दक्षिणेला पिंपळगाव बहुला, उत्तरेला गोदावरी नदी असा विस्तार झाला आहे. आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्‍वरकडे प्रस्थान करणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या दिंडीत गंगापूरवासीयांचा समावेश असतो. गावपणात असलेला सामाजिक एकोपा आजही शहरीकरणात टिकून आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडे गंगापूरच्या रस्त्यावरून जावे लागते. गावात महापालिकेची शाळा असून, दे. ना. पाटील विद्यालय आहे. शिवाय मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयही आहे.

गोदावरीचा पुन्हा दिसू नये तळ
सेंट्रल गोदावरी या २७ खेड्यांची अर्थवाहिनी असलेल्या संस्थेची आर्थिकदृष्ट्या प्रकृती ठीक व्हायला हवी, अशी अपेक्षा गंगापूरचे ज्येष्ठ भागूजी रामचंद्र पाटील, भीमराव गंगाधर पाटील, राजाराम पुंजाजी पाटील, रमेश मुरलीधर गोधडे, निवृत्ती धोंडू पाटील, मुरलीधर काशीनाथ पाटील यांनी व्यक्त  केली आहे. १९६९, २००८, २०१६ या गोदावरीच्या महापुराचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठांमध्ये गेल्या वर्षी कोरड्या पडलेल्या गोदावरीचा तळ पाहायला मिळाल्याची खंत आहे.  ही स्थिती पुन्हा येऊ नये, याकडे 
लक्ष दिले जावे, अशीही अपेक्षा ज्येष्ठांची आहे.

स्थानिकांच्या ठळक अपेक्षा
गंगापूरमधील गोदावरी परिचय उद्यान सात वर्षांपासून तयार आहे. त्याबाबत आतापर्यंत महापालिकेच्या पाच आयुक्तांना माहिती देण्यात आली. मात्र, उद्यान महापालिकेकडे हस्तांतरित आणि उद्यान खुले झालेले नाही. त्याची दुरवस्था संपुष्टात आणून उद्यान खुले करावे.
वाढलेल्या वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढत असतानाच बळवंतनगर, सावरकरनगर, गंगापूर भागात जलकुंभाची उभारणी करावी. वाहनतळाचा प्रश्‍न निकाली काढावा. 
गुंतवणूक म्हणून विकत घेतलेल्या खुल्या जागांचा विकास झालेला नाही. त्यामुळे गलिच्छपणाचे स्वरूप येऊ लागले आहे. त्यावर उपाय म्हणून मालकांनी सहा महिन्यांनी साफसफाई करून घ्यावी अन्यथा महापालिकेने साफसफाईवर लक्ष केंद्रित करावे. 
आनंदवलीत महापालिकेच्या तीन शाळा आहेत. वावरे विद्यालयामधील विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांपेक्षा अधिक आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. उपाय म्हणून उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग करावा.
गोदाकाठचे मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था संपुष्टात आणत असताना पर्यटकांची वर्दळ वाढविण्यासाठी उपक्रम राबवायला हवेत.

आनंदवलीमधूनही महापौरपद
गावठाण, सिरेन मिडोज, बेंडकोळीनगर, बळवंतनगर, रामेश्‍वरनगर, चेरी हील, स्वामी विवेकानंदनगर, काळेनगर, पाइपलाइन रोड, श्री गुरुजी रुग्णालय, नवश्‍या गणपती, पाटील नेस्ट, भोसला, शंकरनगर, सावरकरनगर असा आनंदवलीचा विस्तार झालाय. इथली लोकसंख्या २० हजारांहून अधिक आहे. गटग्रामपंचायतीत जाधव, कडलग आणि आदिवासी कुटुंबातील तिघांना सदस्य म्हणून बिनविरोध निवडून दिले जात होते. स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यावर नऊ सदस्य झाले. पंढरीनाथ जाधव सरपंच, तर भीमराव पाटील-कडलग उपसरपंच झाले. अकराशे लोकसंख्या असलेल्या भागाचे सरपंच म्हणून पंढरीनाथ जाधव यांना पुन्हा संधी मिळाली. नंतरच्या महापालिका निवडणुकीत प्रकाश मते यांनी शिवाराचे प्रतिनिधित्व करत महापौर म्हणून शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान मिळविला. पुढे दोनवेळा सुरेश गायकवाड नगरसेवक म्हणून निवडून आले. अरुण काळे आणि इंदुमती काळे यांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिले. आता संतोष गायकवाड, राधा बेंडकोळी, नयना गांगुर्डे नगरसेवक आहेत. इथले ७५ टक्के जण शेतीवर अवलंबून होते. गंगापूर उजवा कालवा याच भागातून गेला होता. कांदा, ऊस, भाजीपाला, फुले असे उत्पादन घेतले जायचे. जाधव, काळे, कडलग, बेंडकोळी, मंडलिक, रोकडे, गायखे, लवंड कुटुंबीयांची वस्ती गावपणात होती. गोदावरीलगत ११ एकरांवर बजरंगनगर वसले आहे. भोसलाशेजारी अडीच एकरावर संत कबीरनगर आहे. पिवळापट्टा झाल्यावर नोकरदार आणि व्यावसायिकांचे वास्तव्य वाढले आहे. राघोबादादा आणि आनंदीबाई यांना मुलगा झाल्यावर त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. मुलाच्या जन्मानिमित्त चावंडसचे नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आले. आनंदवलीचे आणखी सामाजिक ऐक्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे, नवश्‍या गणपतीशेजारी दर्गा आहे.

रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण व्हायला हवे. पार्किंगची सुविधा व्हावी. बेंडकोळी आणि सोमेश्‍वर नाला प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने त्याकडे लक्ष दिले जावे. बेंडकोळी नाल्यातून वाहणारे रासायनिक पाणी थेट गोदावरीत मिसळत आहे. प्रदूषण थांबविण्यासाठी मलनिस्सारण केंद्र तत्काळ होणे आवश्‍यक आहे. शाळेच्या बाजूने वाहणारा नाला आनंदवलीपर्यंत बंदिस्त केला असला, तरी तो पुढे उघडा आहे. त्याची स्वच्छता नाही. पावसाळ्यात नाला वाहतो. हा प्रश्‍न मिटावा.
- भीमराव पाटील-कडलग, माजी उपसरपंच

गंगापूरमधील दवाखान्याला उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर विकसित करायचे आहे. अंतर्गत ८५ टक्के रस्त्यांची कामे झाली असून, उरलेली कामे पूर्ण करायची आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेचा प्रश्‍न निकाली काढायचा आहे. पाइपलाइन रोड, गंगापूरमध्ये भाजीमार्केट आणि गोदाकाठचे गणेश विसर्जन केंद्र ही कामे करीत असतानाच जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन जलवाहिनी टाकायची आहे. पाइपलाइन रोडवरील आरक्षणाच्या जागेत क्रीडांगण, जिम्नॅशिअम, जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट उभे करायचे आहे. शिवनगर, बजरंगनगरमधील घरमालकांची नावे मालमत्ता पत्रावर नोंदवायची आहेत. वेळेवर फॉगिंग व्हावे, साफसफाई व्हावी, घंटागाडी वेळेत यावी या कामांत सातत्य राखले जाईल. 
- विलास शिंदे, नगरसेवक

गोदावरी नदीवर अरुण काळे यांच्या पुढाकारातून पूल उभारण्यात आला. त्यामुळे दरी, मातोरी, चांदशी, जलालपूर जोडले गेले. शिक्षण संस्थांचा विस्तार झाला. मात्र, महापालिका शाळा ते पूलापर्यंतचा रस्ता अरुंद आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली आहे. हा प्रश्‍न सुटायला हवा. पायवाट अशी नोंद असल्याने हा रस्ता नगररचना विभागांतर्गत घेत रस्त्याचा विस्तार व्हायला हवा. गोदाकाठच्या स्मशानभूमी परिसरात दशक्रिया घाट व्हावा. स्मशानभूमीचे आणखी एक शेड उभारावे. त्याचबरोबर महापालिका शाळेच्या संकुलात ३६ व्यापारी गाळे खुले व्हावेत. आनंदवलीत बसथांबा, क्रीडांगण व्हावे.
- अशोक जाधव, स्थानिक रहिवासी

आनंदवली ते मीनाताई ठाकरे उद्यान असा रोप-वे व्हायला हवा. गोदावरीमध्ये प्लॅटफॉर्म उभारून पक्षी निरीक्षणाची व्यवस्था करायला हवी. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत त्याचा समावेश होता; पण हे काम अद्याप झालेले नाही. शिवाय गोदावरीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करावा. सोमेश्‍वर ते नवश्‍या गणपती आणि पुढे मीनाताई ठाकरे अशी मोटारबोटची सुविधा व्हावी. वृक्षारोपणाने हा परिसर अधिक खुलविला जावा. रिंगरोडने वाहतूक, वर्दळ कमी करण्यास प्राधान्य मिळावे. गंगापूर धरण ते एकलहरे या २३ किलोमीटर मार्गावरील उजवा कालवा थेट पाइपलाइनसाठी बुजवला असून, या भागात मिनी ट्रेन सुरू करावी. गोदा पार्कचा विस्तार करून सायकल ट्रॅक उभारावा.
- अरुण काळे, माजी नगरसेवक

जेहान सर्कल ते गंगापूर रस्त्यावरील अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बाबी हटविल्या आहेत. हे खूप चांगले झाले. आता रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करायला हवे. नवश्‍या गणपती मंदिराच्या परिसरातील दोन खुल्या भूखंडावर वृक्षारोपण करावे. जॉगिंग टॅक व्हावा. 
- नितीन जाधव, स्थानिक रहिवासी

नवश्‍या गणपती परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळायला हवा. गोदावरीकाठी १९९२ मध्ये बांधलेला घाट पुरात खचल्याने तो पूर्ववत बांधावा. नाशिकदर्शन बसगाडीचा थांबा नवश्‍या गणपतीच्या परिसरात करावा. नवश्‍या गणपतीच्या दक्षिण बाजूला संरक्षक भिंत बांधून जमिनीची धूप थांबवावी.
- राजू जाधव, स्थानिक रहिवासी

राजवाड्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी. क्रीडांगण व्हावे. पथदीप कायम सुरू राहतील, अशी व्यवस्था करावी. जलतरण तलाव, नाट्यगृहाची उभारणी करावी.
- अनिल साळवे, स्थानिक रहिवासी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com