गंगापूरकरांना शैक्षणिक संकुलाची प्रतीक्षा

गंगापूरकरांना शैक्षणिक संकुलाची प्रतीक्षा

मुक्त विद्यापीठाद्वारे शिक्षणाची अर्थात, ‘ज्ञानगंगा घरोघरी’ पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गंगापूर, आनंदवली या गावांतील विद्यार्थ्यांची दहावीनंतरच्या शिक्षणाची परवड आजही ‘जैसे थे’ आहे. त्यासाठी गंगापूर गावात अथवा शिवाजीनगर परिसरात महाविद्यालय उभारावे, अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे. दुसरीकडे आनंदवली गावातील महापालिका शाळेतील मुलांचे खासगी शाळेत पळवापळवीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. यावर ग्रामीण भागाचा टच असलेल्या या परिसरात शिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्या पाहिजेत. चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले, तर पालकांनाही आपल्या पाल्यांना स्थानिक शिक्षण संस्थेतच प्रवेश घ्यायला आवडेल.

गंगापूर-गोवर्धन गावाचा इतिहास पौराणिक आहे. याच गावाच्या नावाने गोदावरी नदीवर ब्रिटिशांनी गंगापूर धरण उभारले आहे. शेतीने समृद्ध असलेल्या या परिसरात मुक्त विद्यापीठाला शेकडो एकर जागा देऊन ग्रामस्थांनी नाशिकचा विकासाचा बहुमान वाढवला आहे. हे खरे असले, तरी या टुमदार गावातील विद्यार्थ्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील दे. ना. पाटील माध्यमिक संस्थेत दिले जाते. त्यानंतरच्या शिक्षणासाठी शहरातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. गावाला लागून दोन किलोमीटरवर मुक्त विद्यापीठ आहे, पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. काही दिवसांपूर्वीच गावठाणच्या जागा काही मोठ्या राजकारण्यांच्या शिक्षण संस्थांनी मिळविल्या आहेत. त्यात एकाने कॅम्पस्‌ उभारला आहे, तर दुसरी संस्था मात्र न्यायालयाच्या वादात अडकल्यामुळे काही दिवसांपासून काम थांबवण्यात आल्याचे कळते. 

गंगापूर गावातील पुत्र मुरलीधर पाटील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत संचालक आहेत. त्यांच्याकडून गावाला महाविद्यालय मिळेल, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, गावाचे दुसरे पुत्र व महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या प्रभागात कार्बन नाका परिसरात महाविद्यालय व शाळेसाठीचा मोठा भूखंड आरक्षित आहे. त्यासाठी श्री. पाटील यांनी प्रयत्न केले, तर महाविद्यालय उभे करून गंगापूरसह सातपूर, पिंपळगाव बहुला, आनंदवली आदी भागांतील विद्यार्थ्यांना दहावीनंतरचा शिक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे.

औद्योगिक क्षेत्राला लागून असलेल्या गंगापूर, शिवाजीनगर, श्रमिकनगर व अशोकनगर या भागांत लाखोंच्या संख्येने कामगार राहतात. त्यांच्या मुलांची शिक्षणाची सोय होऊ शकते.

महापालिकेतील समावेशामुळे आनंदवलीचा नावलौकिक
शहरातील सर्वांत श्रीमंत लोकवस्ती भाग म्हणून जेहान सर्कलपासून ते आनंदवली, गंगापूर रोड ओळखला जातो. पण याच भागात या अतिश्रीमंत लोकांच्या घरात धुणीभांडी व औद्योगिक क्षेत्रात ठेकेदारीवर काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेही याच परिसरात विविध झोपडपट्ट्यांत राहतात. भावी पिढीला शिक्षण देण्यासाठी महापालिकेच्या शाळा संजीवनी देत आहेत, तर श्रीमंतांच्या मुलांसाठी इंटरनॅशनल शाळा व महाविद्यालय आहे. गावाजवळच सर्व सुविधा उपलब्ध असल्याने लोकांमध्ये समाधान आहे.

एकमेव आनंदवली हे गाव म्हणावे लागेल
गरीब कुटुंबातील भावी पिढीला, तसेच झोपडपट्ट्यांतील नागरिकांच्या मुलांसाठी शहराचे प्रथम महापौर शांतारामबापू वावरे यांनी आनंदवली गावातच पहिली शाळा सुरू केली. पुढे या भागातील लोकप्रतिनिधींनी महापालिकेची शाळा सुरू केली. कामगारनगर आदी भागातही शाळा सुरू करून शिक्षणाचे माध्यम उपलब्ध करून दिले. जवळच असणाऱ्या भोसला मिलिटरी, एचपीटी-आरवायके, बीवायकेसह विविध नावाजलेली महाविद्यालये हाकेच्या अंतरावर असल्याने आनंदवलीच्या विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.

वडाळागावात आज बैठक
गावठाण विकाससह इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी उद्या (ता. ३) वडाळागावातील हनुमान मंदिरात सायंकाळी सातला बैठक होत आहे. बैठकीत ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्यासह स्थानिक नगरसेवक मार्गदर्शन करतील. या बैठकीत नागरिकांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल.

गावातील शेतकरी अतिशय सधन आहेत. त्यांच्या कष्टाने त्यांनी मोठी प्रगतीही साधली आहे. गावातील अनेक जण मोठ्या व्यवसायात असून, त्यांची मुलेही इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहेत. पण गावातील गरीब व गरजू मुलांना शिकण्यासाठी कसरत करावी लागते. त्यासाठी या भागात महाविद्यालय असणे गरजेचे आहे.
- विलास शिंदे, महापालिका गटनेते, शिवसेना
 

शिवाजीनगर परिसरात मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालय असून, गुणवत्तेच्या जोरावर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. पण अनेक जण प्रवेशापासून वंचित राहतात. त्यासाठी या भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, एवढीच माफक अपेक्षा आहे.
- अमोल पाटील, भाजप विद्यार्थी संघटना पदाधिकारी

शिवाजीनगर परिसरात मोठा भूखंड शाळेसाठी आरक्षित असून, त्याची संपादन प्रक्रिया सुरू आहे. महापालिकेने तो भूखंड ताब्यात घेतल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी गंगापूर व सातपूरकरांना दहावीनंतरच्या पुढील शिक्षणाची सोय होणार आहे.
- दिनकर पाटील, सभागृहनेते

इतिहासाची किनार लाभलेले आनंदवली गाव महापालिकेत समाविष्ट झाले. त्यामुळे काही प्रमाणात सुविधाही मिळाल्या. गावालगत तसेच खासगी शाळा सुरू झाल्याने गावातील भावी पिढीला मोठी संधी मिळाली, पण गाव असूनही मूलभूत सुविधांबाबत मागे आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
- संतोष गायकवाड, नगरसेवक

गावातील विद्यार्थ्यांसाठी दे. ना. पाटील या संस्थेतर्फे दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. संस्थेने महाविद्यालयासाठी प्रयत्न केले. मुले दहावी व बारावीनंतर शहरातील इतर शिक्षण संस्थांत जातात. त्यामुळे पुढील महाविद्यालय सुरू झाले नाही, पण विद्यार्थ्यांची मागणी असेल, तर त्यासाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल.
- मुरलीधर पाटील, संचालक, मविप्र संस्था

अनेक वर्षांपासून या भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर नाशिकच्या विविध महाविद्यालयांत जावे लागते. त्यात महाविद्यालयात प्रवेश घेताना वशिला लावावा लागतो. शुल्क व डोनेशनही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रवेश घेणे परवडत नाही. त्यासाठी स्थानिक ठिकाणी महाविद्यालय असल्यास निश्‍चित फायदा होईल.
- अमोल निकम, विद्यार्थी 

भोसला महाविद्यालय, तसेच हाकेच्या अंतरावर एचपीटी व इतर मोठ्या खासगी संस्था सुरू झाल्याने या गावातील गरीब व श्रीमंत सर्वांनाच संधी मिळेल, असे वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले शुल्क पाहता उच्चशिक्षण घेणे गरिबांसाठी अवघड होऊन बसले आहे.
- राजू जाधव, अध्यक्ष, नवश्‍या गणपती मंदिर ट्रस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com