नानाविध रूपे तुझी, वंदन तुजला करू या..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभली संधी - ‘सकाळ-एनआयई’, ‘मानवधन’तर्फे शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभली संधी - ‘सकाळ-एनआयई’, ‘मानवधन’तर्फे शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा 

नाशिक - हिंदू धर्मात गणपतीला बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक म्हणून मानला जाणारा देव मानले जाते. वक्रतुंड, एकदंत, महोदय, गजानन विकट आणि लंबोदर ही गणेशाची देहविशेष दर्शवणारी प्रमुख नावे. गणपतीचं कुठल्याही कलाकृतीतून साकारणारे रूप हे आगळेवेगळेच असते. छोट्या बालदोस्तांनी तयार केलेल्या शाडूतूनही गणेशाची अशीच नानाविध रूपे पाहायला मिळाली आणि क्षणभर ‘वंदन तुजला करू या... ’ असंच म्हणावंसं वाटलं. निमित्त होतं, ‘सकाळ- एनआयई’ व ‘मानवधन’तर्फे झालेल्या शाडू गणेशमूर्ती कार्यशाळेचं. कार्यशाळेचा दुसरा भाग उद्या (ता. २०) सकाळी नऊला धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक शाळा, पाथर्डी फाटा येथे होईल.

शासकीय कन्या विद्यालयात आज ही कार्यशाळा झाली. कार्यशाळेत विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. यानिमित्त विद्यार्थी व पालकांनी विविध आकाराच्या गणेशमूर्ती तयार केल्या. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व समजावे, त्यांनी पर्यावरणाला हानी न पोचवता इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी दर वर्षी ही कार्यशाळा घेण्यात येते. या विद्यार्थ्यांना मूर्ती घडवण्यासाठी रोहित पगारे, प्रिया सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. मानवधन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, मुख्याध्यापिका ज्योती चौधरी उपस्थित होत्या.

मी पहिल्यांदाच शाडूपासून गणेशमूर्ती बनवत आहे. वडील आणि मी मिळून ही गणेशमूर्ती तयार करत आहोत, यासाठी आम्ही वेगळ्या मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. 
- समर्थ राऊत (विद्यार्थी)

‘सकाळ- एनआयई’च्या शाडू गणेशमूर्ती कार्यशाळेत दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. पाच वर्षांच्या मुलीसोबत या कार्यशाळेत मला सहभागी होता आले, यासाठी ‘सकाळ’चे मनःपूर्वक आभार.
- कश्‍मिरा सूर्यवंशी (पालक)