भाजीबाजाराचं गाव बदललं तरीही टपालावर जुनाच पत्ता

भाजीबाजाराचं गाव बदललं तरीही टपालावर जुनाच पत्ता
सरपंचपदापासून नगराध्यक्ष ते खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले बाळासाहेब देशमुख, माजी उपनगराध्यक्ष सुकदेवदादा कदम, माधवराव देशमुख, स्वातंत्र्यसैनिक काकासाहेब खोडदे यांनी देवळालीगावाची ओळख अधोरेखित केली. देशमुख, खोडदे, कदम, खोले, धोंगडे, भागवत, अरिंगळे, खर्जुल, पवार-गायखे, गाडेकर, खालकर, खेलूकर, भालेराव, बागूल, आवटे, शहाणे, बुवा, गिते, मंडलिक कुटुंबीयांनी गावाच्या विकासात योगदान दिले. 1953 मध्ये नाशिक रोड-देवळाली नगरपालिका स्थापन झाली. तत्कालीन नगराध्यक्ष अप्पासाहेब अरिंगळे, केरू पुंजा हगवणे, डॉ. दिघे यांनीही गावाच्या विकासाकडे लक्ष दिले. पुढे हाच भाग 1982 मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला. मुळातच भाजीबाजाराचं गाव म्हणून आपले अस्तित्व कोरणाऱ्या भागाचा विकास मजल-दरमजल करत झाला असला, तरीही टपालावर अजूनही जुनाच पत्ता टाकला जातोय. अशा या देवळालीगावाच्या वाटचालीविषयी...

तेली गल्ली, धनगर गल्ली, वरची आळी, अरिंगळे गल्ली, भागवत गल्ली, मौलाना आझाद रोड, माळीवाडा, कुंभारवाडा, मुल्लावाडा, पंजाबवाडा या नावाने देवळालीगावातील भाग ओळखले जातात. गावात तलाठी आणि विकास सोसायटीचे कार्यालय आहे. या गावात पूर्वी मोठा भाजीबाजार भरायचा. यशवंत मंडईमध्ये भरणाऱ्या भाजीबाजारात देवळाली कॅम्प, भगूर, वडनेर, पिंपळगाव खांब, दाढेगाव, पांढुर्ली, लहवितपासूनचे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणायचे. सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत बैलगाड्यांच्या वर्दळीने परिसर फुलून गेलेला असायचा. भाजीपाला खरेदी करण्यासाठी मुंबईचे व्यापारी यायचे. ट्रकमधून भाजीपाला मुंबईला घेऊन जात असत. मात्र, वादविवादाच्या ठिणग्या पडत राहिल्याने भाजीबाजार देवळाली कॅम्पकडे सरकला. मात्र, अजूनही ब्रिटिश काळापासून सोमवार पेठ भागातील मैदानावर आठवडेबाजार भरतो. हाच आठवडेबाजार महात्मा गांधी पुतळा ते गाडेकर मळ्यापर्यंत विस्तारित होत गेला. आठवडे बाजारासाठी ओढा, खेरवाडी, घोटी भागातील शेतकरी येतात. प्रसिद्ध आठवडे बाजारात दिवसभरात एक कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रोजचा भाजीबाजार आता आठवडेबाजार मैदानावर भरतो आहे. हा भाग घासबाजार म्हणून ओळखला जातो.

स्थानिकांनी केले स्थलांतर
नगरपालिकेच्या काळात देवळालीगावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास होती. ती आता वीस हजारांच्या पुढे आहे. पण गावपण सोडून शहरीकरणात मुलांच्या शिक्षणासाठी अनेकांनी स्थलांतर केले. स्थानिकांच्या स्थलांतराचे प्रमाण 80 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या घरांमध्ये भाडेकरूंची संख्या वाढली आहे. याखेरीज गावात होणाऱ्या कुस्त्यांच्या परंपरेतून भगूरचे बलकवडे, लहवितचे पाळदे या मल्लांनी यश मिळविले. वालदेवीच्या किनाऱ्यावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जायचे. आता शेतीचे क्षेत्र डोबीमळा आणि परिसरात शेती उरली असून, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.

ऐतिहासिक सभांच्या उरल्या आठवणी
देवळालीगावात ऐतिहासिक सभा झाल्या. त्यासाठी सार्वजनिक पाराची व्यवस्था होती. (स्व.) नेते यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, (स्व.) नेते बाळासाहेब देसाई यांच्या सभा झाल्याच्या आता आठवणी उरल्या आहेत कारण सभा होण्यासाठी जागा उरलेली नाही. पण त्याविषयी न बोलले बरे, अशी काहीशी धारणा स्थानिकांची झाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवत सुरक्षेचा प्रश्‍न निकाली काढत असतानाच वायफाय योजना राबविण्याचा मानस आहे. गटारमुक्त वालदेवी नदी करत दुतर्फा वृक्षारोपण करून जॉगिंग ट्रॅक, ग्रीन जिम, उद्यान उभे करायचे आहे. यशवंत मंडई बीओटी तत्त्वावर देऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकायची आहे. सौभाग्यनगर भागातील नाना-नानी पार्कचे काम करायचे आहे. रोकडोबावाडी, सुंदरनगर, वडारवाडी, बागूलनगर, अण्णा भाऊ साठेनगर भागातील झोपडपट्टीवासीयांना आहे त्या जागेवर घरे देण्याचा मानस आहे. त्याचबरोबर कुस्त्याच्या मैदानाच्या भागात महिलांसाठी कुटीरोद्योग सुरू करायचा आहे.
सत्यभामा गाडेकर (नगरसेविका)

माजी आमदार बाबूलाल अहिरे यांची कन्या महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभापती झाली, याचा स्थानिकांना अभिमान आहे. पण अगदी सुरवातीच्या काळात "जॉबलेस' असताना मी एक अंगणवाडी चालवली आहे. आता विमा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नीटनेटक्‍या मुलांना "प्ले ग्रुप'मध्ये पाठवतात, अगदी तशी मुले अंगणवाडीत यावीत एवढी जागृती मला करायची आहे. धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना प्रशिक्षण देऊन कौशल्याधिष्ठित करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तेली गल्ली, आठवडेबाजार, विहितगाव, पिंपळगाव खांब, वडनेर या भागातील महापालिकेच्या शाळांसाठी खेळणी व उद्याने असावीत, यासाठी माझा प्राधान्यक्रम आहे.
सरोज अहिरे, नगरसेविका

देवळालीगावात 1962 मध्ये बांधलेल्या यशवंत मंडईत काही काळ लग्नकार्य व्हायचे. त्यानंतर 1992 ते 97 मध्ये नगरसेवक असताना पालिका बाजार बांधायचा होता. तीनमजली इमारतीत व्यावसायिकांसाठी 52 गाळे, शासकीय कार्यालयांसाठी 22 खोल्या, तळमजल्यावर भाजीपाला बाजार आणि तिसऱ्या मजल्यावर हॉल, अशी त्याची रचना होती. एक कोटी पाच लाखांचा कामाची निविदा निघाली होती. पण स्थानिक राजकारणात पालिका बाजाराचे काम झाले नाही. हे काम झाले असते, तर गावाच्या विकासाला चालना मिळाली असते. टपऱ्या ठेवण्यासाठीची धावपळ आणि भटंकती टाळली असती.
शंकरभाई मंडलिक, माजी नगरसेवक

माजी खासदार (स्व.) बाळासाहेब देशमुख यांनी आम्हाला दान म्हणून अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात बिटको हॉस्पिटल, बिटको महाविद्यालय, कन्या शाळा, सोमाणी उद्यान अशी कितीतरी गोष्टींचा समावेश आहे. बिटको महाविद्यालयात त्यांच्या पुढाकारातून संगणकाच्या शिक्षणाची सोय झाली. हे कमी काय म्हणून त्यांनी सांगितल्यानुसार माझे आजोबा गरिबा मणियार यांनी विठ्ठल मंदिरासाठी जागा दिली.
अस्लम मणियार, माजी नगरसेवक

महाशिवरात्रीनंतर सप्तमीला भरणाऱ्या यात्रोत्सवासह इतर विषयांवरील कामकाज करण्यासाठी पंचकमिटी कार्यरत आहे. त्यात विविध कुटुंबीयांना स्थान दिले आहे. त्यामुळे या पंचकमिटीचा सदस्य म्हणून काम पाहत असताना लोकांना उद्‌ध्वस्त करणारा विकास नकोय, ही मूळ भूमिका आहे. झोपडपट्ट्यांमध्ये चालणेदेखील मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांमधील सुविधांमध्ये वाढ व्हायला हवी. त्याच वेळी तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मितीवर भर द्यायला हवा.
प्रमोद बुवा, स्थानिक रहिवासी

महात्मा गांधी पुतळा ते तेली गल्ली या भागात गटारीची व्यवस्था नसल्याने कॉंक्रिटीकरण फोडावे लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही विकासाची सुरवात परत परत तीच तीच कामे करावी लागणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज आहे. तसेच आमच्या भागातील जलवाहिनी "वॉशआउट' व्हायला हवी. कुस्त्यांच्या मैदानाजवळ पोलिस चौकी व्हायला हवी.
मंगेश लांडगे, स्थानिक रहिवासी

म्हसोबा, गणपती, शनी, दंड्या मारुती, दक्षिणमुखी हनुमान, श्रीराम, विठ्ठल, रेणुका, श्रीकृष्ण, भैरवनाथ, महादेव, बिरोबा अशा मंदिरांमुळे देवळालीगावाची ओळख मंदिरांचे गाव, अशी आहे. पण मंदिरांचे पावित्र्य राखले जाईल याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. जुन्या कृष्ण मंदिराचा विकास व्हायला हवा. कुस्त्यांच्या मैदानाजवळ गाळे उभारले जावेत.
प्रकाश गोहाड, स्थानिक रहिवासी

देवळालीगावातील स्वच्छतेला प्राधान्य मिळायला हवे. महापालिकेने अभ्यासिका उभारली, पण ती सुरू केली नाही. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना प्रशासकीय सेवेत करिअर करण्यासाठी ही अभ्यासिका तातडीने सुरू करणे आवश्‍यक आहे. सभेच्या पाराशेजारील भागात गटारीमुळे सुटणाऱ्या दुर्गंधीचा बंदोबस्त तातडीने व्हावा.
ज्ञानेश्‍वर चव्हाण, स्थानिक रहिवासी

(उद्याच्या अंकात : विहितगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com