महापालिकेत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

कक्षाच्या माध्यमातून
सरकारने नेमून दिलेल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण
सफाई कर्मचारी नियोजन करणार
शौचालयांची निर्मिती व नियमित साफसफाई
स्वच्छतेसाठी महापालिकेला मार्गदर्शन करणार

नाशिक - स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांत नाव येणे अपेक्षित असतानाच यंदा शंभरीपलीकडे फेकल्या गेलेल्या नाशिकला पुन्हा स्वच्छतेच्या बाबतीत ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. भोपाळ व इंदूरच्या धर्तीवर हा कक्ष स्थापन केला जाईल. ही माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली.

गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा झाल्यानंतर देशात नाशिकचा क्रमांक वरचा होता. पण दुसऱ्या वर्षाच्या सर्वेक्षण यादीत मात्र १५६ वा क्रमांक नाशिकला मिळाल्याने दीडशे क्रमांकाच्या वर फेकल्या गेलेल्या नाशिकला स्वच्छतेत पहिल्या दहात आणण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. पालिका प्रशासनाला तशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 

स्वच्छतेत सर्वांत मोठा अडसर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमरतरता भरून काढण्यासाठी आउटसोर्सिंगचा पर्याय त्यांनी दिला आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या स्वच्छतेत लक्ष घातल्याने पालिका प्रशासन जोरदार कामाला लागले. इंदूर देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने तेथे काय उपाययोजना करण्यात आल्या, त्याची पाहणी करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे पथकही पाठविण्यात आले होते. त्याच पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्येही स्वच्छता कक्षाची स्थापना करण्याची घोषणा आयुक्त कृष्णा यांनी केली. 

महिनाभरात कक्षाची स्थापना होईल. प्रथम केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करून स्वच्छतेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार स्वच्छतेचे नियोजन केले जाईल. घंटागाडीतील कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांची निर्मिती, शहराची साफसफाई आदी बाबी या स्वच्छता कक्षातर्फे केल्या जाणार असल्याचे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.