आ. फरांदेंचे कार्यकर्ते, निकुळेंचे नातेवाईक घरकुल योजनेचे लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नाशिक - जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात राबविलेल्या घरकुल योजनेचे लाभार्थी निश्‍चित करताना बोगस लाभार्थी घुसविण्यात आले. आमदार देवयानी फरांदे यांचे कार्यकर्ते व स्थानिक नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या नातेवाइकांचा भरणा अधिक असल्याने मूळ लाभार्थी योजनेपासून वंचित राहिले आहेत. आमदार फरांदे यांच्या घरात निश्‍चित करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याची मागणी पश्‍चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

महापालिकेने शिवाजीवाडी व भारतनगर येथे सुमारे ६३० सदनिकांची घरकुल योजना राबविली.  घरकुलांसाठी शंभर फुटी रस्त्यावर अतिक्रमण हटविले. नंतर लाभार्थ्यांची यादी निश्‍चित करताना माजी नगरसेवक यशवंत निकुळे व भाजपच्या नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. दीडशे खोटे लाभार्थी दर्शविण्यात आले. लाभार्थी निवडीचे सर्व नियम बासनात गुंडाळून भाजप कार्यकर्ते व त्यांच्या नातेवाइकांच्या नावावर घरे केल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी केला. लाभार्थ्यांची यादी आमदार फरांदे यांच्या निवासस्थानी निश्‍चित करण्यात आली. आमदार फरांदे यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असून, चौकशीची मागणी त्यांनी केली.

लाभार्थ्यांमध्ये विद्यमान नगरसेविका रूपाली निकुळे यांच्या सासूबाई मुक्ता केशव निकुळे, दीर जगन केशव निकुळे, तर नणंद भारती वसंत जोशी, तिचे दीर मनोहर रमेश जोशी, चंद्रकांत रमेश जोशी, विजय रमेश जोशी, तसेच माजी नगरसेविका माधुरी जाधव यांच्या कुटुंबातील रत्नाबाई जाधव यांची नावे घरकुल लाभार्थ्यांत आहे. पाणीपुरवठा अधिकारी अजीज अब्दुल गनी शेख यांच्या नातेवाईक हुस्ना अजीज शेख, शाहीन अजीज शेख यांचीही नावे यादीत आहेत.

आमदार म्हणून देवयानी फरांदे चौकशी करू शकतात; परंतु त्यांच्या निवासस्थानी लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. मनपासह शासनाची यंत्रणा त्यांनी वापरली आहे. याविरोधात आंदोलन करू.
- डॉ. हेमलता पाटील, सभापती, ना. पश्‍चिम

अनेक वर्षांपासून घरकुले तयार आहेत; परंतु गरिबांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शिवाजीवाडी येथील नागरिक माझ्याकडे तक्रार घेऊन आले. लाभार्थी निश्‍चित करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यात कुठलाच हस्तक्षेप झालेला नाही. चुकीची नावे समाविष्ट झाली असतील, तर बोगस लाभार्थी आयुक्तांनी शोधावेत
- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत समाविष्ट नावे खरी आहेत. माझी सासू व दीर शिवाजीवाडी येथील रहिवासी आहेत. महापालिका प्रशासनाने कागदपत्रे तपासूनच, घटनास्थळाचे पंचनामे तयार करून नावे निश्‍चित केली. नगरसेवक होण्यापूर्वी लाभार्थ्यांच्या यादीत नावे समाविष्ट झाली. डॉ. हेमलता पाटील यांनी केलेले आरोप खोटे  आहेत.
- रूपाली निकुळे, नगरसेविका