वैद्यकीय उपकरणांसाठी "सीएसआर'द्वारे एक कोटी - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

भेट देणे हा मार्ग नाही.... 
बालमृत्यूप्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनी जिल्हा रुग्णालयास भेट दिल्यानंतर पालकमंत्री महाजन म्हणाले, बालमृत्यूप्रकरणी सरकार गंभीर आहे. त्यासंदर्भात आपण सतत आरोग्य विभागाच्या संपर्कात होतो. 55 बालके दगावणे ही बाब गंभीरच आहे; पण त्यासाठी येथे येऊन बैठका घेण्याने समस्यांवर मार्ग निघेल असे नाही. उलट आता या प्रकरणाच्या मुळाशी पोचणे गरजेचे आहे.

नाशिक - जिल्हा रुग्णालयात नवजात बालमृत्यूप्रकरणी तब्बल दोन आठवड्यांनी आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेत रुग्णालयात उपकरणांची कमतरता असल्याची स्पष्ट कबुली दिली. तसेच शासकीय पातळीवर तातडीने उपकरणे उपलब्ध होण्याची मंत्र्यांनाच शाश्‍वती नसल्याने सीएसआर (सामाजिक उत्तरदायित्व निधी) मधून एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करून देत येत्या दहा दिवसांमध्ये 18 इन्क्‍युबेटर, सीपॅप व आणखी पाच व्हेंटिलेटर्स उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. बालमृत्यूची मूळ समस्या गर्भवती कुपोषण हेच असल्याने याबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

"सकाळ'ने "इन्क्‍युबेटरचा कोंडवाडा' या मथळ्याखाली शासकीय जिल्हा रुग्णालयातील नवजात बालमृत्यूचे वास्तव उजेडात आणले होते. बालमृत्यूच्या घटनेने हादरलेल्या आरोग्य विभागाने तत्काळ नाशिकमध्ये धाव घेतली व उपाययोजनांची तजवीज केली. पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दोन आठवड्यांनी आज जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. 

महाजन म्हणाले, ""फिनोलेक्‍स कंपनीचे प्रकाश छाब्रिया यांच्या ट्रस्टकडून "सीएसआर'च्या माध्यमातून 50 ते 60 लाख रुपयांची मंजुरी घेण्यात आली. त्यातून जादा 16 इन्क्‍युबेटर, सीपॅप उपकरणे येत्या 10 दिवसात उपलब्ध होतील. तसेच "आयसीयू' कक्षातही आणखी पाच व्हेंटिलेटर उपलब्ध होतील. याशिवाय अनेक अद्ययावत उपकरणेही उपलब्ध होतील. सरकारी पातळीवरूनही निधी उपलब्ध होईल; पण शासकीय कारभाराची प्रक्रिया अडचणीची व वेळखाऊ असल्याने "सीएसआर'मधून समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. 

Web Title: nashik news girish mahajan