पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

नाशिक - नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मोठा गाजावाजा करून आज घेतलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या जनता दरबारात वैयक्तिक, सार्वजनिक आणि प्रशासनाच्या विरोधातील तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारलेल्या नाशिक महापालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांनी दीडशेपेक्षा जास्त तक्रारी दाखल केल्याने स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे दरबारात सावळा गोंधळ होऊन तो तीन भागांत घेण्याची नामुष्की ओढवली. आजच्या दरबारात २९५ तक्रारींची सुनावणी झाली.

आज अनेक तक्रारदारांचे समाधान न झाल्याने मालेगाव, कळवण, नांदगाव व बागलाणसह येवल्याचा जनता दरबार ६ नोव्हेंबरला मालेगाव येथे, तर नाशिक महापालिका हद्दीतील नागरिकांचा जनता दरबार १६ नोव्हेंबरला महापालिका कार्यालयात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी संघटना, प्रहार, अपघाताग्रस्त कामगारांनी निदर्शने करून समस्यांकडे लक्ष वेधले. पालकमंत्री महाजन यांनी आज पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील नियोजन भवनात जनता दरबार घेतला. या वेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.  जनता दरबारासाठी प्रत्येक तालुक्‍याच्या तक्रारदारांना आधी नावनोंदणी व प्रश्‍न नोंदणी करणे गरजेचे होते. त्यानुसार नाशिक तालुक्‍यापासून या दरबाराची सुरवात झाली. निफाड, दिंडोरी, पेठची सुनावणी झाल्यानंतर दुपारी तीनला नाशिक महापालिका हद्दीतील नागरिकांच्या प्रश्‍नांबाबत १६ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचे जाहीर करावे लागले. त्या वेळी सभागृहाबाहेर उपस्थित असलेल्या नाशिकमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. पण पोलिसांनी मध्यस्थी करून पालकमंत्री महाजन यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली. त्या वेळी मंत्री महाजन यांनी रात्री नऊनंतर नाशिकची सुनावणी घेऊ, असे सांगितले. सिन्नर तालुक्‍याची सुनावणी सायंकाळी पावणेसहापर्यंत ती चालली. नंतर इगतपुरी, सुरगाणा, देवळा, त्र्यंबकेश्‍वर व चांदवड यांची सुनावणी रात्री पावणेनऊपर्यंत सुरू होती.

नाशिक महापालिका हद्दीतील नागरिकांचा जनता दरबार १६ नोव्हेंबरला होणार असला, तरी दोन नागरिक शेवटपर्यंत तळ ठोकून असल्याने रात्री पावणेनऊला जिल्ह्यातील सुनावणी संपल्यानंतर प्रहार संघटनेचे दत्तू बोडके व कार्यकर्त्यांनी शहरातील समस्या मांडल्या. त्यात स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारसांना घरे मिळणे, अपंगांना मुद्रा योजनेतून कर्ज न मिळणे हे प्रश्‍न उपस्थित केले. याला जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तरे दिली. 

भुजबळांच्या कार्याचे दाखले 
या वेळी काही नागरिकांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांची उदाहरणे दिली. पिण्यासाठी मनमाडला आवर्तन सोडताना भुजबळ मंत्री असताना आमचा तलाव भरून द्यायचे, असे एका निफाडच्या नागरिकाने सांगितले. दिंडोरीच्या रहिवाशाने भुजबळांनी जसा मोठा उड्डाणपूल बांधून त्यांचे नाव कायमचे कोरले आहे, तसेच तुम्हीही नाशिककरांच्या आठवणीत राहील, असे काम करण्याचे आवाहन केले. 

दर दोन महिन्यांनी जनता दरबार!
यापुढे दर दोन महिन्यांनी जिल्ह्यात जनता दरबार घेऊन नागरिकांच्या तक्रार निवारणाचे काम केले जाईल, अशी घोषणा करतानाच वीजजोडणी खंडित करणे, प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्यांबाबत लवकरच शासन निर्णय निघणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली. वीजबिल थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पाच हप्ते करून दिले जाणार आहेत. भारनियमनाची वेळ बदलण्याचा प्रश्‍न मंत्रिमंडळ बैठकीत मांडून दिलासा देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

आमच्याकडेही तीच बोंब
सुरगाण्याच्या नगराध्यक्षांनी, युतीतील घटक पक्ष शिवसेनेचे नगरसेवक व भाजपचे चार नगरसेवक कामे करून देत नाहीत. विकासकामांचे कार्यारंभ आदेश देऊ देत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर पालकमंत्र्यांनी आपल्या मित्रपक्षाचे सदस्य काम करू देत नाहीत, अशी तक्रार आहे का, असे विचारले. त्यावर त्यांनी ‘हो’ म्हटल्यावर मंत्री महाजन यांनी ‘आमचीही तीच बोंब’ असल्याचे सांगितले. यावर सभागृहात हशा पिकला. 

जनता दरबारात झालेले निर्णय
वृद्ध कलावंतांना मानधन देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची समिती 
‘पेसा’च्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
निफाड तालुक्‍यातील शिवरस्त्याची मोजणी करून अतिक्रमणधारकांकडून करवसुली करावी
निफाड तालुक्‍यातील गोरठाण येथील डीपी तातडीने बसवावी
प्रत्येक गावात स्मशानभूमी शेड उभारावी
नाशिक- दिंडोरी, नाशिक- येवला रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा 
ओझरखेडच्या पर्यटन विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करा
नद्यांचे पाणी प्रदूषित झाल्याने धरणांचे पाणीही प्रदूषित होते. यावर गांभीर्याने विचार सुरू
एसटीपी प्लॅंटसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय 
सुरगाणा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या प्रश्‍नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी
त्र्यंबकेश्वर येथील इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची रक्कम आठ दिवसांत जमा करावी
गिरणारे आणि इतर गावांच्या ९८ कोटींच्या पाणीयोजनेला मान्यता अंतिम टप्प्यात

नाशिक महापालिकेच्या कारभाराविरोधात दीडशे तक्रारी
पालकमंत्री महाजन यांनी आज जनता दरबार भरविल्यानंतर पहिल्या तासाभरातच नाशिक महापालिकेसंदर्भात दीडशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता येथपासून ते अडीचशे कोटींच्या रस्त्यांची आवश्‍यकता आहे का, यासारखे प्रश्‍न जनता दरबारासाठी नोंदवण्यात आले आहेत. शहरातील तक्रारी सोडविण्यासाठी दुपारची वेळ ठरवली होती. दुपारी एक ते दोन या वेळेत तक्रारी दाखल करून घेतल्या. महापालिकेशी संबंधित दीडशेहून अधिक तक्रारी आल्याने १६ नोव्हेंबरला पालिका मुख्यालयातच जनता दरबार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय पक्षही तक्रारकर्त्यांमध्ये सहभागी आहेत. महापालिकेतील सत्ताधारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्याने महापालिकेसंदर्भातील तक्रारी वाढल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com