तोतया पीए संदीप पाटीलकडून बडोलेंच्या नावाचाही गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

तलाठ्याच्या नोकरीसाठी चार लाखांना गंडा, वैद्यकीय-अभियांत्रिकी प्रवेशातही फसवणुकीची शक्‍यता

तलाठ्याच्या नोकरीसाठी चार लाखांना गंडा, वैद्यकीय-अभियांत्रिकी प्रवेशातही फसवणुकीची शक्‍यता
नाशिक - जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगणाऱ्या संशयित संदीप पाटील याने सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचाही स्वीय सहायक असल्याचे सांगत एकाला तलाठ्याच्या नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. सध्या सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्रवेशासंदर्भातही त्याने काहींना वैद्यकीय वा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आर्थिक गंडा घातल्याची शक्‍यता आहे. दरम्यान, त्यास जिल्हा न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

पालकमंत्री महाजन यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करून संदीप नरोत्तम पाटील (वय 35, रा. पखाल रोड) याने गेल्या रविवारी (ता. 2) ठक्कर बझार येथील सह्याद्री हॉटेलचे मालक सचिन पानमंद यांना शिवीगाळ करून दमदाटी केली होती. या प्रकरणी पानमंद यांनी शहानिशा केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या तोतया स्वीय सहायकाविरोधात सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी त्यास मंगळवारी रात्री अटक केली. संदीपचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून, त्यात असलेल्या माहितीवरून त्याने वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठीही काहींना लाखोंचा गंडा घातला असण्याची शक्‍यता आहे.