कोठरेत नकोशी आढळल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

अंबासन - जागतिक कन्यादिनाच्या पूर्वसंध्येला कोठरे (ता. मालेगाव) येथील फाट्यानजीक तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक रस्त्यालगतच्या खड्ड्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

अंबासन - जागतिक कन्यादिनाच्या पूर्वसंध्येला कोठरे (ता. मालेगाव) येथील फाट्यानजीक तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक रस्त्यालगतच्या खड्ड्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

अर्भकास मालेगाव सामान्य रुग्णालयात हलविले आहे. अनैतिक संबंधातून जन्मलेले, कुमारीमाता, मुलगी झाली म्हणून, आर्थिक अडचणी, दारिद्य्र किंवा अधिक अपत्य सांभाळण्याची क्षमता नसणे या कारणांमुळे अर्भक टाकून  दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक आढळल्याने विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून शेजारच्या शेतकऱ्यांना जमा केले. लोकांनी धाव घेत खड्ड्यात उघड्यावर टाकलेल्या अर्भकास बाहेर काढले. सकाळी गारवा असल्यामुळे बाळ गारठलेल्या अवस्थेत होते. तेथीलच एका शेतकऱ्याने माणुसकीचे दर्शन दाखवत अंगावरील कपडे काढून बाळास गुंडाळले. तर काहींनी पोलिस ठाणे, १०८ ला संपर्क करून रुग्णवाहिकेस पाचारण केले. वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित पाटील यांनी प्रथमोपचार केले. स्थानिक आरोग्यसेविकांनी गायीचे दूध उपलब्ध करून दिले.

विनापरवानगी प्रसूती 
मालेगाव, सटाणा तालुक्‍यांत काही ठिकाणी विनापरवानगी गरोदर महिलांची प्रसूती केली जात असल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे गरोदर महिलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार कधी थांबेल, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कोठरे फाट्यानजीक सापडलेले स्त्री जातीचे जिवंत अर्भक त्याचे ताजे उदाहरण असल्याचे बोलले जाते.

नकोशीला दत्तक देतील काय?
खड्ड्यात स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक आढळून आल्याची बातमी मोबाईल, व्हॉट्‌सॲपद्वारे पसरताच बघ्यांनी तोबा गर्दी केली होती. सुरत, मालेगाव, अंबासन आदी ठिकाणांहून नकोशीला दत्तक घेण्याची तयारी दर्शविली. अनेकांनी तर आपण सर्व दत्तक घेण्यासाठी पूर्तता करू; पण नकोशीला आम्हीच घेऊ. देतील का हो नकोशीला दत्तक, अशी विचारणा केली.

याबाबत निर्दयी मातेचा कसून शोध घेतला जाईल. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत संगोपनासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या ताब्यात दिले आहे. 
- सुहास राऊत, पोलिस निरीक्षक, वडनेर खाकुर्डी