नऊवर्षीय मुलीचा डेंगीमुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

जुने नाशिक - बागवानपुरा परिसरातील हरीमंजिल येथील नऊवर्षीय मुलीचा आज डेंगीमुळे मृत्यू झाला. येथील अस्वच्छता व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे झालेल्या दुर्लक्षाने मुलीस जीव गमवावा लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.  

जुने नाशिक - बागवानपुरा परिसरातील हरीमंजिल येथील नऊवर्षीय मुलीचा आज डेंगीमुळे मृत्यू झाला. येथील अस्वच्छता व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे झालेल्या दुर्लक्षाने मुलीस जीव गमवावा लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.  

जुने नाशिक प्रभाग १४ मधील हरीमंजिल येथे राहणारी आयेशा शेख (वय ९) हिला डेंगीची लागण झाली होती. तीन दिवसांपासून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज तिची तब्येत अत्यवस्थ झाल्याने तिला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात उपाचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आयेशाचा मृत्यू झाल्याची माहिती पसरताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. अस्वच्छतेच्या गर्तेत सापडलेल्या जुन्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लक्ष दिले जात नाही. औषध, धूरफवारणी कधी झाली तो दिवसही आठवत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. येथील नगरसेवकांचेही याकडे दुर्लक्ष होत असून, निवडणुकीत विजय प्राप्त झालेल्या नगरसेवकांचा चेहराही विसरल्याचे त्यांनी सांगितले.

धूर व औषधफवारणी कामामध्ये केली जाणारी टाळाटाळ केल्यामुळे डेंगी, साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. धूर व औषधफवारणी ठेकेदारासह आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. याबाबत स्थायी समितीत आवाज उठविणार असून, आयुक्तांकडेही तक्रार करणार आहे. 
-मुशीर सय्यद, नगरसेवक