गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नाशिक - श्रावणाच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याला सुरवात झाल्यानंतर 52 दिवसांमध्ये पहिल्यांदा नाशिककरांची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे.

गंगापूर धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सकाळी आठपासून पुराच्या पातळीत वाढ होण्यास सुरवात झाली आणि भांडी-सराफ बाजाराप्रमाणे गोदाकाठचे विक्रेते-पुरोहितांची परवड सुरू झाली. दीप अमावस्यानिमित्त धार्मिक विधीसाठी आलेल्या यजमानांचे विधी कपालेश्‍वर पोलिस चौकीशेजारील जागेप्रमाणेच वस्त्रांतरगृहात करण्यास सुरवात झाली. पावसाचा जोर उद्या दुपारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोठ्या 7 आणि मध्यम 17 अशा 24 प्रकल्पांमधील पाण्याचा साठा 54 टक्‍क्‍यांपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हेच प्रमाण 40 टक्‍क्‍यांपर्यंत होते.

दरम्यान, जिल्ह्यातील धरणातून गोदावरीमध्ये सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे जायकवाडीकडे आज सकाळपर्यंत 14 टीएमसी पाणी रवाना झाले होते. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातून पाणी सोडल्याने जायकवाडीकडे रवाना झालेल्या पाण्यात 4 टीएमसीची भर पडली आहे.