हॉकर्स झोनविरोधात महापालिकेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक - महापालिकेने हॉकर्स झोनबाबत एकतर्फी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शहरातील हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावरील विक्रेत्या, फेरीवाल्यांच्या कृती समितीने आज महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

नाशिक - महापालिकेने हॉकर्स झोनबाबत एकतर्फी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शहरातील हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावरील विक्रेत्या, फेरीवाल्यांच्या कृती समितीने आज महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

गेल्या महिन्यात महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासमवेत हॉकर्स संघटनांची बैठक झाली होती. त्यात जिल्हा टपरीधारक युनियनतर्फे शहरातील सर्व भागांत झालेले सर्वेक्षण व महापालिकेने सुचविलेल्या हॉकर्स झोनला विरोध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हॉकर्स संघटनेने सुचविलेल्या पर्यायी जागांचा विचार झाला नसल्याचे त्या वेळी निदर्शनास आणून दिले होते. महापालिकेने सुचविलेले हॉकर्स झोन ग्राहकांची वर्दळ नसलेल्या जागेवर असून, त्या ठिकाणी व्यवसाय होणार नाही. शिवाय ना फेरीवाला धोरणामध्ये निश्‍चित झाले नाही. समितीनेही अद्याप कुठलेच झोन निश्‍चित केलेले नाहीत. ही बाब महापौरांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये निदर्शनास आणून दिली होती. त्या वेळी विभागवार बैठका घेऊन सुचविलेल्या पर्यायांचा विचार करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यावर विचार न करता विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची सूचना काढण्यात आली असून, ही बाब अन्यायकारक असल्याने त्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. महापालिकेने एकतर्फी झोनबाबत निर्णय घेऊ नये, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली. या वेळी शांताराम चव्हाण, सुनील बागूल, सय्यद युनूस, शिवाजी भोर, बाळासाहेब उगले, दिनेश जाधव, संदीप जाधव, पुष्पाबाई वानखेडे, जावेद शेख, सुनील संधानशिव, नवनाथ ढगे आदी उपस्थित होते.