आरोग्य विभागाचा डेंगी नियंत्रणाचा दावा फोल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नाशिक - गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी असून, आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभागाचा दावा फोल ठरला आहे. शहरात औषध फवारणी नियमित होत नसल्याने तीन आठवड्यांत डासांचा प्रादुर्भाव वाढून ५१ डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. अद्याप ११६ संशयित रुग्णांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यातून संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जूनमधील दहा दिवस वगळता शहरात सातत्याने पाऊस पडत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरात डासांच्या समस्येने तोंड वर काढले आहे. एकीकडे धूरफवारणी होत नाही, तर दुसरीकडे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. आरोग्य विभागाने आज आरोग्य समितीला सादर केलेल्या अहवालात ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत डेंगीचे ५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ११६ संशयितांवर उपचार सुरू आहेत.

घट झाल्याचा ‘आरोग्य’चा अजब दावा
जानेवारी ते ऑगस्टदरम्यान १०५ डेंगीचे रुग्ण आढळले. त्यातील सात महिन्यांत ५४, तर फक्त ऑगस्टच्या तीन आठवड्यांत ५१ रुग्ण आढळले. एकीकडे रुग्ण वाढत असताना आरोग्य विभागाने गेल्या वर्षाच्या तुलनेत ७७ टक्के घट झाल्याचा दावा केला आहे. मागील वर्षात ऑगस्टमध्ये डेंगीचे १८७ रुग्ण होते. या वर्षी ऑगस्टमध्ये ५१ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ४६३ डेंगीचे रुग्ण होते.