काझीची गढीवासीयांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

माती खचून एका घराचे पत्रे कोसळले

जुने नाशिक - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे काझी गढीवासीयांचा जीव टांगणीला लागला आहे. शुक्रवारी (ता. १४) रात्री झालेल्या जोरदार पावसाने येथील दशरथ कदम यांच्या घराच्या खालील माती कोसळून खांब पडल्याने छताचे पत्रेही कोसळले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची भीती आणखी वाढली आहे. 

संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत असलेल्या काझी गढीवासीयांचा जीव पावसाळा सुरू झाला की टांगणीला लागतो. महापालिका नोटीस बजावून त्यांचे काम पूर्ण करते, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाकडून त्यावर ठोस काही निर्णय घेतला जात नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ असते. पावसामुळे येथील दोन घरांच्या भिंतीस लागून असलेली माती रोज थोडी-थोडी घसरत आहे. कदम यांचे गढीच्या अगदी कडेला पत्र्याचे घर आहे. घराच्या छताला एका खांबाचा आधार आहे. तो खांबही शुक्रवारी झालेल्या पावसाने खाली कोसळल्याने त्यावरील पत्रेही खाली आले. सुदैवाने कदम एकटे घराच्या समोरील भागात असल्याने त्यांना दुखापत झाली नाही. त्यांच्या घरात कोणी बसू शकेल अशी जागाही नाही. मोलमजुरी करत असल्याने इतर ठिकाणी भाड्याने घर घेणे शक्‍य नसल्याने येथेच जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या पावसानंतर अधिकारी आले व आमचे काही ऐकण्याच्या आत निघून गेल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. पाऊस सुरू झाला, की प्रत्येक जण आपल्या घरात जातो. येथे मात्र उलट आहे. आम्ही सर्व रात्रभर घराच्या बाहेर थांबतो. केव्हा काय होईल, याची भीती वाटत असते.

रोज थोडी-थोडी माती घसरत आहे. तरीही पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन येथेच राहावे लागत आहे.
- दशरथ कदम, रहिवासी