टाटा कन्सल्टन्सी, शिर्डी संस्थान तयार करणार हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

नाशिक - राज्यातील हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंगचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास योजनेमधून टाटा कन्सल्टन्सी व शिर्डी संस्थानतर्फे ‘फिनिशिंग स्कूल’सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी मंत्रालयात डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली.

आमदार जयवंत जाधव, शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, कौशल्य विकासचे आयुक्त ई. रवींद्रन, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणचे संचालक अनिल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शैलेश कुटे, संजय खैरनार आदी उपस्थित होते. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग पदविका घेतल्यावर तुटपुंज्या ज्ञानामुळे तरुणांना चांगल्या हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळत नाही, असे आमदार जाधव यांनी निदर्शनास  आणून दिले. 

नाशिकमध्ये ‘ट्रॅफिक वॉर्डन’ 
नाशिकमध्ये वाढत्या रहदारीचे नियोजन करण्यासाठी ‘स्मार्टसिटी’अंतर्गत ‘ट्रॅफिक वॉर्डन’ची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविणार असून, गृह विभागाकडून नियमावली तयार करण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी दिले. गृहरक्षक दलाच्या धर्तीवर वाहतूक मदतनीस योजना राबविण्यात यावी, याबाबत मंत्रालयात बैठक झाली. आमदार जाधव, अतिरिक्त पोलिस महासंचालक (परिवहन) आर. के. पद्मनाभन, पोलिस आयुक्त (परिवहन) अमिताभ कुमार, अतिरिक्त महामार्ग पोलिस आयुक्त विजय पाटील, महाराष्ट्र ट्राफिक वॉर्डन असोसिएशनचे समन्वयक संतोष शेलार आदी उपस्थित होते. ठाणे आणि नांदेडमध्ये ‘ट्रॅफिक वॉर्डन’ हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करीत आहेत. नाशिकमध्ये ५ सप्टेंबर २०१४ ला पोलिस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करून ‘ट्रॅफिक वॉर्डन’ योजना सुरू करण्यात आली होती. त्यांना वाहतुकीचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे ९० दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, ही योजना शहरात बंद करण्यात आली असल्याचे आमदार जाधव यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, ‘ट्रॅफिक वॉर्डन’ची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.