वाढदिवसाच्या रात्रीच नवविवाहितेस जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

प्रियंकाचा विवाह वर्षभरापूर्वी वसई येथे कृषी अधिकारी असलेल्या दीपक नानासाहेब सोमवंशी याच्यासमवेत झाला होता,  मात्र लग्नानंतर प्रियंकास नवऱ्यासह सासरच्यांकडून छळ सुरु झाला. गेल्या 9 तारखेला रात्री प्रियंकाला तिच्या वाढ दिवसाच्याच रात्री सासरच्यांनी  बेदम मारहाण केली आणि विष पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

नाशिक : वाढदिवसाच्या रात्रीच नवविवाहितेस बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न सुंदरपुर (ता निफाड) येथे घडला. प्रियंका दीपक सोमवंशी असे विवाहितेचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दहा दिवसांनंतर निफाड पोलिसात सासरकडील चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, व छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, प्रियंकाचा विवाह वर्षभरापूर्वी वसई येथे कृषी अधिकारी असलेल्या दीपक नानासाहेब सोमवंशी याच्यासमवेत झाला होता,  मात्र लग्नानंतर प्रियंकास नवऱ्यासह सासरच्यांकडून छळ सुरु झाला. गेल्या 9 तारखेला रात्री प्रियंकाला तिच्या वाढ दिवसाच्याच रात्री सासरच्यांनी  बेदम मारहाण केली आणि विष पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

नंतर अत्यंत गंभीर स्थितीमध्ये तिला निफाडच्या प्राथमिक रुग्णालय दाखल करण्यात आले. सदरची माहिती मिळताच प्रियंकाचे आईवडील व भाऊ नाशिकहून पोहोचले आणि त्यांनी नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात दहा दिवसांनंतर प्रियंकाचा पती दीपक सोमवंशी, सासरे नानासाहेब संतोष सोमवंशी, सासु आशा नानासाहेब सोमवंशी आणि दीर अमोल नानासाहेब सोमवंशी या चौघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच प्रियकांचा छळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसाकडून सुरवातीपासूनच टाळाटाळ करण्यात आल्याने संशयित पसार होण्यात यशस्वी झाले.  संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची करण्याची मागणी प्रियकांच्या नातलगांनी केली आहे.

टॅग्स