'सिव्हिल'मध्ये इन्क्‍युबेटर दोन दिवसांत कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालमृत्यू प्रकरणानंतर जाग आलेल्या आरोग्य विभागाने मंजूर केलेल्या 16 पैकी नऊ इन्क्‍युबेटर जिल्हा रुग्णालयास मिळाले आहेत. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागातील (एसएनसीयू) विशेष कक्षामध्ये तांत्रिक व्यवस्था उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या दोन दिवसांत नवीन नऊ इन्क्‍युबेटर कार्यान्वित होतील. यामुळे एसएनसीयू कक्षात 27 इन्क्‍युबेटरच्या माध्यमातून नवजात बालकांवर उपचार करणे सोपे होणार आहे, तर आणखी 7 इन्क्‍युबेटर्स आठवडाभरात दाखल होणार आहेत.

"इन्क्‍युबेटरचा कोंडवाडा' या मथळ्याखाली "सकाळ'मधून नवजात बालमृत्यू प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या आरोग्य विभागाने तातडीने पावले टाकत राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयामधील नवजात बालमृत्यू व इन्क्‍युबेटरचा आढावा घेतला असता, त्यातून भीषण वास्तव समोर आले होते. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने दौरा करून पाहणी केली आणि इन्क्‍युबेटरची संख्या वाढविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. 28) तीन तर आज सहा इन्क्‍युबेटर जिल्हा रुग्णालयास प्राधान्याने उपलब्ध झाले आहेत. तर येत्या आठवडाभरात आणखी 7 इन्क्‍युबेटर मिळणार आहेत. ज्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये नवजात बालकांच्या उपचाराची संख्या अधिक आहे, अशा रुग्णालयांमध्येही इन्क्‍युबेटर प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

सीएसआरमधून मिळाले इन्क्‍युबेटर
सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) पहिल्या टप्प्यात नऊ इन्क्‍युबेटर मिळाले आहेत. यातील तीन इन्क्‍युबेटर हे बारामती ऍग्रो, तर सहा इन्क्‍युबेटर हे विप्रो या दोन कंपन्यांकडून मिळाले आहेत. आणखी सात इन्क्‍युबेटरही "सीएसआर'मधूनच मिळणार आहेत. इन्क्‍युबेटरची संख्या वाढल्याने दिवसाला दाखल होणाऱ्या 40 बालकांवर उपचार करणे सोयीचे होणार आहे.