कचरापेट्या खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करा

कचरापेट्या खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करा

नाशिक - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात व्यावसायिक जागेवर लावलेल्या कचरापेट्यांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपानंतर सत्ताधारी भाजप खडबडून जागा झाला आहे. महापौर रंजना भानसी यांनी कचरापेटी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडे केली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या मानांकनामध्ये नाशिकला वरच्या क्रमांकावर आणण्यासाठी महापालिकेने धडपड सुरू केली आहे. या संधीतूनही हात मारण्याचा प्रयत्न झाला आहे. शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा ठराव करूनही स्वच्छ भारत अभियानांतर्गत बाजाराच्या ठिकाणी स्टॅन्डपोस्ट कचरापेटी लावली जात आहे. एकीकडे महासभेचाच ठराव भंग असताना दुसरीकडे कचरापेट्यांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे पुढे आले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने अडीच ते तीन हजार रुपयांना मिळणारी स्टॅन्डपोस्ट कचरापेटी ११ हजार १२१ रुपयांना खरेदी केली आहे. शहरात १८९ ठिकाणी स्टॅन्डपोस्ट कचरापेटी लावली आहे. अजून खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी भाजपला घेरण्याची तयारी केली असताना महापौर भानसी यांनीच आयुक्‍त कृष्णा यांच्याकडे चौकशीची मागणी केली.

प्रशासनाचे हात वर
अभियानासाठी केंद्र सरकारकडून निधी आल्याने महापालिकेचा संबंध नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे; परंतु महासभेला खरेदीबाबत माहिती करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याची भूमिका महापौर भानसी यांनी स्पष्ट केली. याबाबत आयुक्तांनीही अतिरिक्त आयुक्त किशोर बाेर्डे यांच्या पातळीवर झालेल्या खरेदीची तातडीने माहिती मागविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com