नांदूर मध्यमेश्‍वरला "खिचन'चा प्रयोग शक्‍य

कांड्या करकोचा स्थलांतरीत पक्ष्यांचा थवा.
कांड्या करकोचा स्थलांतरीत पक्ष्यांचा थवा.

नाशिक - राजस्थानमधील जोधपूरपासून दीडशे किलोमीटरवरील खिचन गाव. ग्रामस्थांच्या अनमोल कामगिरीमुळे ते जगाच्या नकाशावर झळकले आहे. स्थलांतरित अन्‌ शेतातील धान्याचा फडशा पाडणाऱ्या कांड्या करकोच्याचे यशस्वी संवर्धन करीत गावाने पर्यटनातून विकास साधला. हाच प्रयोग नांदूर मध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात राबविणे शक्‍य असल्याचे पक्षिमित्रांचे म्हणणे आहे.

मीटरभर उंचीचा कांड्या करकोचा हा पक्षी मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो. करड्या रंगाच्या असलेल्या पक्ष्याच्या डोक्‍यावर करडा पट्टा असतो. सुरेख पांढरी भुवई आणि गळ्यावर काळ्या रंगाचा मफरलप्रमाणे पट्टा असतो. कर्कश आवाज करणाऱ्या आणि थव्यांनी वास्तव्य करणाऱ्या या पक्ष्यासाठी खिचन गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीने तारांचे कुंपण केले. ऑगस्टपासून इथे येणारे पक्षी मार्चपर्यंत मुक्कामी थांबतात.

सकाळी साडेसातला हे पक्षी खाद्यासाठी या ठिकाणी रोज न चुकता येतात. साडेअकरापर्यंत गावाजवळील तलावावर पाणी पिण्यासाठी जातात अन्‌ मग सायंकाळी पाचला तेथून उडत जाऊन चाळीस किलोमीटरवरील मीठाग्रहात मुक्कामी थांबतात. पक्ष्यांसाठी गहू, मिठाचे दगड अशा खाद्याची जबाबदारी ग्रामस्थांनी उचलली आहे.

रोजगारनिर्मितीला मिळाली चालना
खिचनमधील तरुण पक्षिमित्र मोहन परिहार म्हणाला, की स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनाची परंपरा ग्रामस्थांनी सुरू केली. या पक्ष्यांना कुणीही त्रास देत नाही. रोज हे पक्षी दहा क्विंटल गहू फस्त करतात. हे पक्षी परत गेल्यावरदेखील इथे एक क्विंटल धान्य रोज टाकले जाते. गावातील मोर, कबुतरे आणि इतर पक्षी ते खाण्यासाठी इथे येतात. या पक्ष्यांमुळे गावात मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. देशभरातून पर्यटक खिचनमध्ये पक्षी पाहण्यासाठी येतात. ग्रामस्थ पर्यटकांच्या भोजनाप्रमाणे निवासाची व्यवस्था करतात. ग्रामस्थांनी दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचे संवर्धन स्वखर्चाने करण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे.

नांदूर मध्यमेश्‍वरमध्येही मुक्काम
नांदूर मध्यमेश्‍वरच्या पक्षी अभयारण्य परिसरातील चापडगावजवळील पश्‍चिमेच्या पक्षिनिरीक्षण मनोऱ्याशेजारी कांड्या करकोचा मुक्कामी येतात. नेचर क्‍लबच्या सर्वेक्षणात दोन हजार पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यांच्यापासून परिसरातील शेतातील पिके वाचविण्यासाठी खिचनमधील प्रयोग राबविणे शक्‍य आहे. वन विभागातर्फे हिवाळ्यातील तीन महिने दोन कर्मचारी नियुक्त केले, तरी हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. यासाठी लागणारे धान्य नाशिकच्या पक्षिप्रेमी संस्था आणि व्यक्ती देण्यास तयार आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीच्या जोडीलाच स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यासदेखील करता येणार आहे. एवढेच नव्हे, तर पक्ष्यांची शिकार कमी होईल. त्यामुळे खिचनमधील प्रयोग इथे राबविण्यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पक्षिमित्रांची आहे.
फोटो- 05666
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com