कैलास राणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।।

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

पहिल्या श्रावणी सोमवारी ‘बम बम भोले’चा जयघोष

पंचवटी - कैलास राणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।।, ‘शिवहर शंकर नमामि शंकर’चा जप करीत भाविकांनी पहिल्या श्रावणी सोमवारी कपालेश्‍वरासह महादेवाच्या मंदिरांत गर्दी केली. ‘बम बम भोले’च्या गजरात शिवाची आराधना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने सोमेश्‍वर मंदिरातही दर्शनासाठी गर्दी उसळली. 

पहिल्या श्रावणी सोमवारी ‘बम बम भोले’चा जयघोष

पंचवटी - कैलास राणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।।, ‘शिवहर शंकर नमामि शंकर’चा जप करीत भाविकांनी पहिल्या श्रावणी सोमवारी कपालेश्‍वरासह महादेवाच्या मंदिरांत गर्दी केली. ‘बम बम भोले’च्या गजरात शिवाची आराधना करण्यात आली. पावसाने उघडीप दिल्याने सोमेश्‍वर मंदिरातही दर्शनासाठी गर्दी उसळली. 

भगवान शंकरासमोर नंदी नसलेले एकमेव मंदिर म्हणून कपालेश्‍वरची ओळख आहे. त्यामुळे देशभरातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. आज पहाटेपासूनच दर्शनासाठी रीघ लागली. पहाटे पाचला महापूजा झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरातील दक्षिण दरवाजाने आत जाण्यासाठी, तर उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली. शंकराला प्रिय असणाऱ्या बेलाला मोठी मागणी होती. काही भाविकांनी दर्शनास आलेल्यांना राजगिऱ्याचा लाडू, केळी आदी प्रसाद म्हणून वाटप केले. 

पालखी सोहळा
कपालेश्‍वर महादेव देवस्थान ट्रस्टतर्फे दुपारी चारला पालखी काढण्यात आली. कपालेश्‍वर मंदिरातून निघून पालखी मालवीय चौक, शनी चौकमार्गे काळाराम मंदिरात पोचली. काळाराम मंदिर, सरदार चौकमार्गे रामकुंडावर पोचली. तेथे परंपरेनुसार श्रींच्या चांदीच्या पंचमुखी मुकुटाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाल्यावर रात्री दहाला पालखी पुन्हा कपालेश्‍वर मंदिरात परतली. या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. 

सोमेश्‍वर मंदिरात गर्दी
सोमेश्‍वर मंदिरातही पावसाने उघडीप दिल्याने दर्शनाच्या रांगा दूरपर्यंत पोचल्या होत्या. सहकुटुंब दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी शिवाच्या दर्शनाबरोबरच प्रसिद्ध सोमेश्‍वर धबधब्यालाही भेट दिल्याने या ठिकाणी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी उसळली. मंदिर परिसरात असलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचाही आस्वाद भाविकांनी घेतला. सोमेश्‍वर देवस्थानतर्फे दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली. 

सिद्धेश्‍वर महादेव मंदिर
घारपुरे घाटावरील निसर्गरम्य प्राचीन सिद्धेश्‍वर महादेव मंदिरात भाविकांतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले. पहाटे अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दिल्ली दरवाजाजवळील प्राचीन तीळभांडेश्‍वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली. दत्तमंदिरामागील शर्वायेश्‍वर महादेव मंदिरासह शहरातील अन्य छोट्या-मोठ्या मंदिरांतही दर्शनासाठी गर्दी उसळली होती.